नारायणगाव : पादचारी मार्गावर होतेय पार्किंग | पुढारी

नारायणगाव : पादचारी मार्गावर होतेय पार्किंग

नारायणगाव; पुढारी वृत्तसेवा: वारुळवाडी येथे कॉलेज रस्त्यादरम्यान शालेय विद्यार्थी व नागरिकांसाठी पेवर ब्लॉक बसवून पादचारी मार्ग बनवला आहे. मात्र, याचा वापर वाहन पार्किंगसाठी होत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वाहन पार्किंग करणार्‍या वाहनमालकांवर दंडात्मक कारवाईची मागणी केली जात आहे. वारुळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील कॉलेज रस्त्यादरम्यान माध्यमिक विद्यालय, लहान मुलांच्या शाळा, उच्च माध्यमिक व शेतकी विद्यालय आहेत. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहिवासी संकुल असल्याने या रस्त्यावरून ज्येष्ठ नागरिक, शाळेत जाणार्‍या लहान-मोठ्या मुलांचा नेहमीच वावर असतो. तसेच रस्त्यावरून दुचाकी, चार चाकी गाड्यांची मोठी वर्दळ पहायला मिळते.

विद्यार्थ्यांना व नागरिकांना या रस्त्याने जाताना अपघात होऊ नये, या दृष्टिकोनातून वारुळवाडी ग्रामपंचायतीने सुमारे 20 लाख रुपये खर्चून 2.5 मीटर रुंद व अंदाजे पाचशे मीटर लांब असे पेवर ब्लॉक टाकून पादचारी रस्ता बनवला आहे. त्यामुळे रस्त्याच्या सुशोभीकरणातही भर पडली आहे. मात्र, आजमितीला पादचारी वर्गासाठी बनवलेल्या या रस्त्यादरम्यान मोठ्या प्रमाणात चार चाकी गाड्या पार्किंग करून दिवसभर उभ्या केल्या जातात. परिणामी विद्यार्थी व नागरिकांना या रस्त्याने जाणे गैरसोयीचे बनले आहे. अशा वाहनधारकांवर वारुळवाडी ग्रामपंचायतीने दंडात्मक कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते आदिल शेख यांच्यासह येथील नागरिकांमधून केली जात आहे.

सामाजिक कार्यकर्ते आदिल शेख यांचे या संदर्भातील पत्र ग्रामपंचायतीला प्राप्त झाले आहे. तसेच पादचारी वर्गासाठी बनवलेल्या रस्त्यावर चार चाकी गाड्या पार्क करीत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार, ग्रामपंचायतीकडून या रस्त्यादरम्यान पोल उभारणार असून जे वाहनधारक या ठिकाणी गाडी लावत आहेत, त्यांना प्रथम नोटीस देणार आहे. त्यानंतरही असा प्रकार घडल्यास संबंधित वाहनधारकांवर पोलिस प्रशासनाच्या मदतीने कारवाई करण्यात येईल.
                                                                       -राजेंद्र मेहेर, सरपंच, वारुळवाडी.

Back to top button