आळंदी : माउलींची पालखी अलंकापुरीत परतली; आळंदीकरांकडून भक्तिमय स्वागत | पुढारी

आळंदी : माउलींची पालखी अलंकापुरीत परतली; आळंदीकरांकडून भक्तिमय स्वागत

श्रीकांत बोरावके

आळंदी : आषाढी वारीनिमित्त पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी गेलेली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पालखी शनिवारी आळंदीत परतली. अनेक दिवसांपासून गावातून बाहेर गेलेल्या माउलींच्या दर्शनाची लागलेली आळंदीकरांची ओढ मिटली. वरुणराजानेही रिमझिम बरसात करीत स्वागत केले, तर आळंदीकरांनीही टाळ-मृदंगांच्या निनादाने आळंदीचे आसमंत भक्तिरसात चिंब भिजवून टाकले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी साधारण एक महिन्याचा पायी प्रवास करीत पंढरीच्या विठुरायाची भेट घेऊन शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अलंकापुरीत परतली. माउलींच्या पालखीचे आळंदीकरांनी जंगी स्वागत केले.

पालखीसह शेकडो वारकरी व भाविकांसोबत टाळ-मृदंगांचा गजर करीत संतजनांचा मेळा अलंकापुरीत दाखल होणार असल्यामुळे पालखी मार्गावर रस्त्यांच्या दोन्ही बाजूस स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते. प्रदक्षिणा रस्त्यावर, महाद्वार चौक, नगरपालिका चौकात रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या. ठिकठिकाणी नागरिकांच्या वतीने माउलींच्या पालखीवर फुलांची उधळण केली जात होती.

पालखी वडमुखवाडी परिसरात आल्याचा निरोप आळंदी मार्गावरील भाविकांना समजताच भाविकांनी पायी चालत जाऊन स्वागत केले. पोलिस प्रशासनाच्या वतीने मार्गावर पोलिस बंदोबस्त ठेवला होता. पालखी नगरपालिका चौक, इंद्रायणी घाटमार्गे हरिहरेंद्र मठ, महाद्वारातून मंदिरात विसावली. पालखीचे मंदिर परिसरात आगमन होताच भाविकांनी जोरदार स्वागत केले. त्यानंतर पालखीची विधिवत पूजाअर्चा करण्यात आली.

माउलींना दही-भाताचा नैवेद्य
माउलींची पालखी अलंकापुरीच्या वेशीवर आल्याचे समजताच देवस्थान कमिटीच्या वतीने संभळ, टाळ-मृदंगांच्या गजरात पालखीस परंपरागत सामोरे जात स्वागत करण्यात आले. या वेळी संस्थान कमिटी, चोपदार, पालखी सोहळामालक यांनी माउलींना दही-भाताचा नैवेद्य दाखविला. दही-भाताचा नैवेद्य घेत पालखी अलंकापुरीत दाखल झाली.

Back to top button