मंचर : अपुर्‍या मिनी बसमुळे भाविकांची पायपीट; श्री भीमाशंकरची वाट कष्टदायक | पुढारी

मंचर : अपुर्‍या मिनी बसमुळे भाविकांची पायपीट; श्री भीमाशंकरची वाट कष्टदायक

मंचर; पुढारी वृत्तसेवा: श्री क्षेत्र भीमाशंकर दर्शनासाठी खासगी वाहनाने येणार्‍या प्रवाशांना भीमाशंकरपासून अलीकडे तीन किलोमीटरवरील पार्किंग नंबर एक येथे थांबवून मिनी बस व स्थानिक खासगी जीपने भीमाशंकरकडे पाठविले जाते. मात्र, अपुर्‍या मिनी बससंख्येमुळे बहुतांश जणांना पायीच जावे लागत आहे. परिणामी, भीमाशंकरची वाट कष्टदायक झाली आहे. एसटीतून दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांना पार्किंग नंबर एक येथे सोडले जाते. तेथून पुन्हा भीमाशंकरपर्यंत जाण्यासाठी मिनी एसटी बसमध्ये बसल्यानंतर जाण्या-येण्याचे वीस रुपये आकारून तिकिटाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यातच खासगी जीपचालक प्रवाशांकडून अधिक पैशांची मागणी करतात.

पुण्याहून दररोज मंचरमार्गे अंदाजे बारा ते पंधरा एसटी गाड्या भीमाशंकरकडे जातात. भीमाशंकर परिसरात रस्त्यावर वाहनांची कोंडी होऊ नये म्हणून वाहनतळावर एसटी गाड्या व इतर खासगी वाहने थांबून प्रवाशांना उतरविले जाते. येथून पुढे फक्त एसटीच्या मिनी बस सोडल्या जातात. पुणे येथून बसलेल्या प्रवाशांना श्रीक्षेत्र भीमाशंकरपर्यंत तिकीट घेतले जाते. परंतु, भीमाशंकरच्या अलीकडे तीन किलोमीटरवरील पार्किंमध्येच उतरविले जाते. भीमाशंकर येथे मिनी बसद्वारे प्रवास करताना पुन्हा दुहेरी भाडे वीस रुपये घेतले जाते.

मिनी बसची संख्या वाढवा
भाविकांमध्ये यावरून नाराजी दिसत असून, श्रावण महिना सुरू होण्यासाठी अजून आठवडा बाकी आहे. भीमाशंकरला दर्शनासाठी येणार्‍या प्रवाशांकडून मिनी बसमध्ये पुन्हा तिकीट घेऊ नये व मिनी बसची संख्या वाढवावी, अशी मागणी भाविकांनी केली आहे.
श्री क्षेत्र भीमाशंकर येथे एसटीद्वारे जाणार्‍या भाविकांना थेट श्री क्षेत्र भीमाशंकर येथील बसस्थानक येथे सोडले जाईल. पुन्हा त्यांच्याकडून तिकीट आकारले जाणार नाही, अशा सूचना संबंधित वाहक आणि मंचर, घोडेगाव येथील वाहतूक नियंत्रकांना दिले आहेत.

         – वसंतराव अरगडे, आगार व्यवस्थापक, राजगुरुनगर

Back to top button