मंचर : जायदेवाडीत पाच दिवसांत 24 जनावरांचा मृत्यू | पुढारी

मंचर : जायदेवाडीत पाच दिवसांत 24 जनावरांचा मृत्यू

मंचर; पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात मुसळधार पावसाने भीमाशंकर परिसरातील जायदेवाडी (निगडाळे) येथे गेल्या पाच दिवसांत एकवीस शेळ्या, दोन बैल व एका वासराचा मृत्यू झाला आहे. पशुधनमालकांनी आर्थिक भरपाईची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. जायदेवाडी हे निगडाळे गावच्या दक्षिणेला तीन किलोमीटर अंतरावर आहे. येथील शेतकरी डोंगर परिसरात शेळ्या-मेंढ्या, बैल चरायला घेऊन जातात. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. ढगाळ वातावरण, संततधार पाऊस यामुळे सूर्यदर्शन झाले नाही. त्यातच थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

नेहमीप्रमाणे शेळ्या चरायला नेल्या असताना गेल्या पाच दिवसांत शेतकरी वामन लोहकरे यांच्या दहा शेळ्या, पाच करडे (बकरू) व एका बैलाचा, शेतकरी गेनू कावजी लोहकरे यांच्या सहा शेळ्या व एका बैलाचा आणि शेतकरी मारुती डामसे यांच्या एका वासराचा मृत्यू झाला आहे. एकूणच आदिवासी शेतकर्‍यांचे अंदाजे दोन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने हैराण झालेल्या बळीराजाला पुन्हा एकदा निसर्गाने फटका दिल्याने येथील शेतकरीवर्ग पुरता हतबल झाला आहे. संबंधित घटनेचा प्रशासनाने तातडीने पंचनामा करून पशुपालकांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी वामन लोहकरे, लीलाबाई लोहकरे, गेनू लोहकरे, योगेश लोहकरे, मारुती डामसे, महेश लोहकरे, अंकुश लोहकरे व उमेश लोहकरे यांनी केली आहे.

Back to top button