ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क पडला महागात; सायबर चोरट्यांकडून दीड लाखांचा गंडा | पुढारी

ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क पडला महागात; सायबर चोरट्यांकडून दीड लाखांचा गंडा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: गुगलवरून मिळवलेल्या ग्राहक सेवा केंद्राच्या क्रमांकावर संपर्क करणे एका तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. सायबर चोरट्यांनी संबंधित तरुणीला 1 लाख 41 हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातला. पुणे महापालिकेच्या वेबसाईटवर कर भरल्यानंतर राहिलेला कर भरणा होत नसल्याने तरुणीने ऑनलाईन संकेतस्थळ शोधून ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधला होता. याप्रकरणी महमंदवाडीत एका 44 वर्षांच्या नागरिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सायबर चोरट्याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

हा प्रकार 26 जानेवारी 2022 रोजी घडला होता. फिर्यादी यांच्या मुलीने मोबाईलवरून त्यांच्या पत्र्याचे शेडचा 1 लाख रुपयांचा कर पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन भरला. त्यानंतर राहिलेला कर भरणा होत नव्हता. तेव्हा त्यांनी गुगलवर जाऊन कस्टमर केअर क्रमांक शोधला. त्यावर संपर्क साधताच सायबर चोरट्याने त्यांना आपल्या जाळ्यात खेचले. त्याने एनी डेक्स रिमोट डेक्सटॉप हे अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगून त्यांचे खाते रिकामे केले.

हे लक्षात ठेवाच…
आपल्याला एखादी माहिती मिळाली नाही, तर आपण लगेच गुगलवर जाऊन त्यांच्या ग्राहक सेवा केंद्राचा संपर्क क्रमांक शोधतो. मात्र, येथे सायबर चोरट्यांनी बनावट संकेतस्थळे तयार करून ग्राहक सेवा केंद्राचे संपर्क क्रमांक म्हणून आपले क्रमांक टाकले आहेत. अगदी हुबेहूब थोडासा बदल करून सायबर चोरटे अशी संकेतस्थळे तयार करीत आहेत.

Back to top button