

पुणे: राज्यात 15 जुलैअखेर पावसाची स्थिती गंभीर असून, 36 पैकी तब्बल 27 जिल्ह्यांत कमी पाऊस बरसला आहे. मराठवाड्याची स्थिती गंभीर असून, आठही जिल्ह्यांत सरासरीपेक्षा 45 टक्के कमी पाऊस पडला. कोकणात केवळ सहा टक्के जादा पाऊस आहे. फक्त मध्य महाराष्ट्र अन् विदर्भातील स्थिती समाधानकारक असून, पालघर आणि नाशिक या दोनच जिल्ह्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
यंदा राज्यात मान्सून 26 मे रोजी दाखल झाल्याने पावसाला लवकर प्रारंभ झाला. त्यामुळे जून आणि जुलैमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज होता. मे महिन्यात राज्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली. मात्र, जून आणि जुलै महिन्याने दगा दिला. हवेचे दाब फारसे अनुकूल न झाल्याने 15 जुलैअखेर राज्याची स्थिती गंभीर दिसत आहे. राज्यातील 36 पैकी 27 जिल्ह्यांत कमी पाऊस झाला आहे. सर्वांत खराब स्थिती मराठवाडा भागाची असून, तेथील आठही जिल्ह्यांत खूप कमी पाऊस झाला आहे. (Latest Pune News)
राज्याची विभागवार स्थिती... (मि.मी.)
महाराष्ट्र एकूण : (सरासरीपेक्षा सात टक्के जास्त) (सरासरी ः 360.8 मि. मी., पडलाः 385.4) कोकण : (सरासरीपेक्षा सहा टक्के जास्त) (सरासरी ः 1200 मि.मी., पडलाः 1271.5) मध्य महाराष्ट्र : (सरासरीपेक्षा 24 टक्के अधिक) (सरासरी : 264.3 मि.मी., पडलाः 326.8)
मराठवाडा : (सरासरीपेक्षा 45 टक्के कमी) (सरासरी 212.1 मि.मी. पडलाः 117.1)
विदर्भः (सरासरीपेक्षा 19 टक्के अधिक) (सरासरीः 319 मि.मी. पडलाः 362.7 )
खूप कमी (लार्जली डिफिशियंट) : (मि.मी)
बीड : 75 टक्के तूट (सरासरी :184 मि.मी., पडलाः 74) जालना : 63 टक्के तूट (सरासरी : 203, पडलाः 74.7) सोलापूर : 67 टक्के तूट (सरासरी :41.1, पडलाः 46.6)
अतिवृष्टीचे जिल्हे (2)
पालघर : 60 टक्के
नाशिकः 80 टक्के
हवेचे दाब अनुकूल नसल्याने ही स्थिती आहे. राज्यात सध्या हवेचे दाब 1004 ते 1006 हेक्टा पास्कल इतके आहेत. त्यामुळे मान्सूनचा वेग कमी आहे. प्रामुख्याने मराठवाड्यात खूप कमी पाऊस झाला आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात हे दाब अनुकूल होतील, अशी आशा आहे.
- डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ, पुणे