

पुणे: कल्याणीनगरमधील दोन संगणक अभियंत्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या पोर्श कार अपघातप्रकरणी अल्पवयीन चालकावर प्रौढांप्रमाणे खटला चालवावा, यासाठी पुणे पोलिसांनी केलेला अर्ज बाल न्याय मंडळाने अखेर फेटाळला आहे. त्यामुळे आता या १७ वर्षीय मुलावर बाल न्याय कायद्याअंतर्गत बाल न्याय मंडळापुढेच खटला चालवला जाणार आहे.
१९ मे २०२३ रोजी रात्री अडीचच्या सुमारास कल्याणीनगर येथे ही दुर्घटना घडली होती. महागड्या पोर्श कारने दोन दुचाकीस्वार संगणक अभियंत्यांना जबर धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. (Latest Pune News)
पोलिस तपासात असे निष्पन्न झाले की अपघातावेळी वाहन चालवत असलेला आरोपी फक्त १७ वर्षांचा होता आणि त्याने त्याआधी पबमध्ये मद्यपान केले होते. त्यामुळे या आरोपीला प्रौढ घोषित करून त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेनुसार खटला चालविण्यासाठी पुणे पोलिसांनी बाल न्याय मंडळाकडे अर्ज केला होता.