आंबेगाव तालुक्यात भात लावणीला प्रारंभ | पुढारी

आंबेगाव तालुक्यात भात लावणीला प्रारंभ

मंचर, पुढारी वृत्तसेवा: भात शेतीचे आगार अशी ओळख असलेल्या आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, निगडाळे, कोंढवळ, पोखरी, तळेघर, भागीतवाडी, असाणे, आहुपे आदी गावात भात आवणीला (लावणीला) प्रारंभ झाला आहे. यंदा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने सुरुवात केल्याने शेतकरी भात लावणीत मग्न आहेत. भीमाशंकर, पाटण, आहुपे खोर्‍यातील शेतकरी प्रामुख्याने भात हेच पीक घेतात. या भागात इंद्रायणी, जीर, तांबडा रायभोग, खडक्या या वाणांची लावणी होते. आधुनिक युगातही बैलजोडीच्या सहाय्याने चिखलणी करून भात लावणीची पद्धत या भागात आजही पहावयास मिळते.

बाहेर गावी नोकरी, व्यवसाय करणारे शेतकरीही सुटी काढून इर्जिक पद्धतीने एकमेकांच्या शेतीकामासाठी मदतीला जातात. भात रोपे लावणीसाठी सुरुवातीला चारही बाजूला बांध करून शेतात चिखल केला जातो. त्यानंतर भाताची रोपे ओळीने लावून घेतात. वेळ आणि मजूर खर्चात बचत होत असल्याने पहिल्यांदाच यांत्रिक भात लागवड काही भागात सुरू आहे. सध्या मजुरांची टंचाई भासत असल्याने काही शेतकरी घरच्या घरी तर काही शेतकरी मजूर शोधून आणून भात लावणी करत आहेत. मजुरांचे दरही जास्त असल्याने काही शेतकर्‍यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. काही शेतकरी डोंगर उतारावर नाचणीचे पीक घेत आहेत.

आदिवासी भागात यंदा उशिरा पावसाला सुरुवात झाल्याने भात आवणीला उशीर झाला. ज्या शेतकर्‍याकडे भातलागवड असेल त्या शेतमालकाकडून दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था होते, त्यामुळे भातलागवड वेळेत होते. मजुरांची टंचाई दूर होते.

                          – वामन सखाराम लोहकरे, भात उत्पादक शेतकरी, निगडाळे

 

Back to top button