वेल्हेतील शिक्षकांनी केले सर्वेक्षण, गृहभेटी | पुढारी

वेल्हेतील शिक्षकांनी केले सर्वेक्षण, गृहभेटी

वेल्हे, पुढारी वृत्तसेवा: अतिवृष्टीमुळे दि. 14 ते 16 जुलैपर्यंत जिल्हा प्रशासनाने शाळांना सुटी दिली होती. या कालावधीत वेल्हे तालुक्यातील हिरपोडी व कोंढावळे खुर्द या दोन शाळांतील शिक्षक लवकर निघून गेले. मात्र इतर सर्व शाळांतील शिक्षक हजर होते. शाळेत विद्यार्थी नसल्याने या तीन दिवसांत शिक्षक गावोगाव सर्वेक्षण, गृहभेटी असे कार्यालयीन कामकाज करत होते, असा दावा वेल्हे तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने केला आहे. अतिवृष्टीमुळे शाळांना तीन दिवस सुटी असल्याने विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली होती. मात्र, शिक्षकांनी शैक्षणिक वेळेत शाळेत थांबण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते.

असे असताना तालुक्यातील बहुतांश शाळांत शिक्षक फिरकलेच नाही, असे वृत्त दै. ‘पुढारी’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत शिक्षण विभागाने चौकशी केली. वेल्हे तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी कमलाकर म्हेत्रे म्हणाले, ‘शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांनी तालुक्यातील शाळांची चौकशी केली. त्यात तालुक्यातील सर्व 142 शाळा अतिवृष्टीच्या कालावधीत तिन्ही दिवशी सुरू होत्या. 15 जुलै रोजी हिरपोडी व कोंढावळे खुर्द या दोन शाळा वेळेपूर्वीच बंद करण्यात आल्या होत्या.

’शासन आदेशानुसार शाळाबाह्य व स्थलांतरित विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्याचे तसेच शाळेला सुटी असल्याने शिक्षक गृहभेटी, सर्वेक्षण असे कार्यालयीन कामकाज करत होते, असे गटशिक्षणाधिकारी म्हेत्रे यांनी लेखी निवेदनात म्हटले आहे. हिरपोडी व कोंढावळे खुर्द शाळा वेळेपूर्वी बंद करणार्‍या शिक्षकांची चौकशी सुरू आहे. त्यांच्यावर चौकशीअंती कारवाई करण्यात येणार आहे, असे म्हेत्रे यांनी स्पष्ट केले आहे.

Back to top button