पिंपरी : प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध | पुढारी

पिंपरी : प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात सर्वांधिक 51 हजार 989 मतदार मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेत प्रभाग क्रमांक 24 मध्ये आहेत. तर, सर्वांत कमी 22 हजार 412 मतदार थेरगाव- रहाटणी रस्ता, बापूजीबुवा नगर, शिवतिर्थनगर प्रभाग क्रमांक 34 मध्ये आहेत. महापालिकेने शुक्रवार (दि.22) प्रसिद्ध केलेल्या 1 ते 46 प्रभागनिहाय अंतिम मतदार यादीत एकूण 14 लाख 88 हजार 114 मतदार आहेत. त्यात 8 लाख 384 पुरूष तर, 6 लाख 87 हजार 642 महिला मतदार आहेत.

तर, तृतीयपंथी 88 मतदार आहेत. प्रारूप मतदार यादीतील 10 पुरूष व 5 महिला मतदारांची नावे अंतिम यादी वगळण्यात आले आहेत.
सर्वांधिक मतदारांची संख्या किवळे, रावेत प्रभाग क्रमांक 24 (51,989), बोर्हाडेवाडी, जाधववाडी प्रभाग क्रमांक 3 (45,951), वाकड, भूमकर वस्ती प्रभाग क्रमांक 38 (43,743) आणि पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक 40 (40,951) या चार प्रभागात आहे. चार सदस्य असलेल्या सांगवी प्रभाग क्रमांक 46 या एकमेव प्रभागात मतदारांची संख्या 38 हजार 841 आहे.

तर, सर्वांत कमी मतदारांची संख्या बापूजीबुवा नगर प्रभाग क्रमांक 34 (22,412), वाल्हेकरवाडी, गुरूद्वारा प्रभाग क्रमांक 25 (23,455), मोशी, डुडुळगाव प्रभाग क्रमांक 4 (23,782), थेरगाव, पडवळनगर, बेलठिकानगर प्रभाग क्रमांक 35 (24,363) आणि ताथवडे, पुनावळे, काळाखडक प्रभाग क्रमांक 37 (24,755), एचए कॉलनी, संत तुकारामनगर प्रभाग क्रमांक 17 (25,310), रहाटणी, रामनगर, शिवतिर्थनगर प्रभाग क्रमांक 33 (25,410), सॅण्डविक कॉलनी, रामनगर प्रभाग क्रमांक 7 (25,482) आणि तापकीरनगर, रहाटणी, जोतीबानगर प्रभाग क्रमांक 32 (26,075) या 9 प्रभागात आहेत.

वाकडमधून 8,959 नावे वगळली
वाकड प्रभाग क्रमांक 38 मधून सर्वाधिक 8 हजार 959 नावे वगळण्यात आली आहेत. पिंपळे गुरव, वैदुवस्ती, जवळकरनगर, लक्ष्मीनगर प्रभाग क्रमांक 41 मधून 7 हजार 59 नावे कमी करून इतर प्रभागात समाविष्ट करण्यात आली आहेत. वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा प्रभाग क्रमांक 25 मधून 5 हजार 986, मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती प्रभाग 13 मधून 5 हजार 591 आणि तापकीरनगर, रहाटणी प्रभाग 32 मधून 5 हजार 429 नावे इतर प्रभागाच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.

निवडणूक विभागाचा अनागोंदी कारभार
पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी गुरूवारी (दि.21) पालिकेच्या www.pcmcindia.gov.in  या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली; मात्र, ही यादी दुसर्‍या दिवशी शुक्रवारी (दि.22) रात्री उशीरापर्यंत दिसत नव्हती. पालिकेच्या निवडणूक विभागाचा अनागोंदी कारभार दिसून आल्याने त्याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. तांत्रिक कारणांमुळे यादी अपलोड होण्यास विलंब होत असल्याचे पालिकेचे अधिकारी सांगत आहेत.

चिंचवड प्रभाग 26 मध्ये 6,148 नावे वाढविली
इतर प्रभागाच्या यादीत समाविष्ट झालेली नावे काढून बिजलीनगर, दळवीनगर, इंदिरानगर, चिंचवडेनगर प्रभाग क्रमांक 26 मध्ये सर्वांधिक 6 हजार 148 नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. पिंपळे गुरव, राजीव गांधीनगर, रामनगर, काशिदनगर प्रभाग क्रमांक 44 मध्ये 5 हजार 413 नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. पिंपळे निलख, विशालनगर प्रभाग क्रमांक 39 मध्ये 5 हजार 118 नावे वाढविण्यात आले आहेत. घरकुल, नेवाळे वस्ती प्रभाग क्रमांक 12 मध्ये 4 हजार 403 आणि गवळीमाथा, बालाजीनगर प्रभाग क्रमांक 11 मध्ये 4 हजार 220 नावे जोडण्यात आली आहेत.

Back to top button