पुणे, पुढारी वृत्तसेवा: बेकायदा देशी बनावटीच्या पिस्तूल विक्रीप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांनी दांडेकर पूल परिसरातून पकडले. त्याच्याकडून पिस्तूल घेणार्या दोघांना यापूर्वी अटक केली आहे. सूर्यकांत ऊर्फ पंडित दशरथ कांबळे (वय 26, रा. दत्तवाडी), असे अट क केल्याचे सराईताचे नाव असून, त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे, असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याने रफीक ऊर्फ बबलू नबीलाल शेख (वय 31, रा. दत्तवाडी) व प्रमोद ऊर्फ कमलेश कैलास घारे (वय 31, रा. दांडेकर पूल) यांना देशी बनावटीचे पिस्तूल विकले होते. या प्रकरणात शेख आणि घारे यांनादेखील अटक केली होती.
तसेच त्यांच्याकडून पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत कांबळेने पिस्तुलाची विक्री केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर कांबळेच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर तो पसार झाला होता. तो दांडेकर पूल परिसरातील मांगीरबाबा चौकात थांबल्याची माहिती पोलिस हवालदार कुंदन शिंदे आणि प्रशांत शिंदे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, कर्मचारी चंद्रकांत मरगजे, अनिल सुर्वे यांच्या पथकाने ही कारवाई केली.