पानशेत वसाहत रस्ता खड्डयात | पुढारी

पानशेत वसाहत रस्ता खड्डयात

वेल्हे, पुढारी वृत्तसेवा: पानशेत येथील पाटबंधारे वसाहत रस्त्याची चाळण झाली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरील धोकादायक प्रवासामुळे विद्यार्थ्यांसह पर्यटक, नागरिक त्रस्त झाले आहेत. पावसामुळे रस्त्याचे उरले सुरले डांबर, खडी वाहून जाऊन मोठ मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे एसटी,पीएमपीएल बस गाड्यांसह खासगी वाहनांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. मुख्य पुणे -पानशेत रस्ता प्रशस्त चकचकीत करण्यात आला आहे. मात्र, पानशेत वसाहत, धरणाकडे जाणार्‍या रस्त्याची दुर्दशा झाली आहे.

वसाहतीतील सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पानशेत विभाग अध्यक्ष अंकुशभाऊ पासलकर व माजी उपसरपंच बाळासाहेब कोंडेकर यांनी केली आहे. पानशेत कृती समितीचे तुषार देशपांडे म्हणाले, अनेक वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी केलेले डांबरीकरण पहिल्याच पावसात वाहून गेले. निधी नसल्याने रस्त्याचे काम करता येत नाही, असे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे. दुसरीकडे जिल्हा परिषद व बांधकाम विभागाने पानशेत वसाहत परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे.

Back to top button