शिरूरमध्ये नव्याने केलेला रस्ता उखडला | पुढारी

शिरूरमध्ये नव्याने केलेला रस्ता उखडला

शिरूर, पुढारी वृत्तसेवा: चां.ता.बोरा कॉलेज रस्ता ते हुडको कॉलनी रस्ता व नवीन मार्केट यार्ड हा रस्ता नवीन शिरूर नगर परिषदेकडे जातो. सदर रस्ता तीन महिन्यांपूर्वी केलेला असून, काही ठिकाणी उखडला गेल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नवीन नगरपालिकेकडे जाणार्‍या रस्त्याची अवस्था बिकट झाली होती. हा रस्ता नगर-पुणे राज्य महामार्गाला जोडणारा रस्ता आहे. बाबूरावनगरमधील हॉस्पिटलकडे जाण्यासाठी हा जवळचा रस्ता असल्याने या रस्त्यावर नेहमीच रुग्णवाहिका आणि वाहनांची वर्दळ असते.

शिरूर शहरातील आठवडा बाजार हा शनिवारी असल्याने उपनगरातील नागरिक याच रस्त्याचा वापर शेतकरी आणि आजूबाजूच्या गावातील नागरिक करत असतात. अत्यंत खराब झालेल्या या रस्त्यासंदर्भात दैनिक पुढारीने वेळोवेळी बातम्या प्रकाशित केल्या होत्या. त्याची दखल घेत 14 मार्च 2022 रोजी या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली व कामही पूर्ण झाले. मात्र, काम निकृष्ट झाल्याने कामाला 2-3 महिने पूर्ण होण्यापूर्वीच रस्त्यावरील डांबर निघून गेले आहे. या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्त्यावर शिरूर नगर परिषदेने अंदाजे रक्कम 45,43,534 रुपयांचा खर्च केला आहे.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून चाललेल्या रिमझिम पावसामध्ये या रस्त्याचे डांबर निघून गेले आहे. यावरून ठेकेदाराने हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नगर परिषदेने या रस्त्याच्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी आणि हा रस्ता पुन्हा दुरुस्त करावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा मनसेचे शहराध्यक्ष अविनाश घोगरे, हुडको कृती समितीचे संघटक शैलेश जाधव यांनी दिला आहे.

Back to top button