

पुणे, पुढारी वृत्तसेवा: 'बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे 'आरोग्यवारी' पुणे ते बारामती 100 किलोमीटर रिले शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रिले शर्यत रविवारी ( दि. 24) होणार आहे. चार गटांमध्ये होणार्या या राज्यस्तरीय शर्यतीमध्ये महाराष्ट्रातील सुमारे 750 हून अधिक धावपटू सहभागी झाले आहेत,' अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष आयर्नमॅन सतीश ननवरे व फाउंडेशनचे ट्रस्टी राजू भिलारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या आरोग्यवारीच्या माध्यमातून एकूण 63,000 किमी सामूहिक रनिंग या निमित्ताने पूर्ण होणार आहे. सारसबाग येथून रविवारी पहाटे 4 वाजता रिले रॅलीची सुरूवात होणार असून, संध्याकाळी 6 वाजता तीन हत्ती चौक बारामती येथे याचा समारोप होणार आहे. 10 किलोमीटर, 21 कि.मी., 50 कि.मी. आणि 100 कि.मी. अशा चार वेगवेगळ्या गटांमध्ये ही शर्यत होणार आहे. सारसबाग ते गाडीतळ, हडपसर या 10 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये पुण्यातील अनेक धावपटूंनी सहभाग नोंदविला आहे.
गिनिस बुक ऑफ रेकॉर्ड खेळाडू प्रीती म्हस्के ही 64 किमी शर्यतीमध्ये भाग घेणार आहे. मॅरथॉन धावपटू अमित कुमार हे 100 किमी शर्यतीमध्ये भाग घेणार आहेत. तसेच, लोकेश पाटील, राकेश कुमार, हेमंत पाटील, सुनील अगरकर आणि तामली बासू हेही 100 किमी शर्यतीमध्ये सहभागी होणार आहेत. औरंगाबादचे सचिन घोगरे, साताराचे विशाल घोरपडे, मुंबईतील 6 आणि पुण्यातून 19 धावपटू, असे एकूण 50 धावपटू 100 किमीच्या शर्यतीमध्ये भाग घेणार आहेत.