पुणे : आवाज दडपण्यासाठी यंत्रणेचा होतोय वापर; पृथ्वीराज चव्हाण यांची केंद्रावर टीका | पुढारी

पुणे : आवाज दडपण्यासाठी यंत्रणेचा होतोय वापर; पृथ्वीराज चव्हाण यांची केंद्रावर टीका

पुणे; पुढारी वृत्तसेवा: “देशात सध्या लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. केंद्र सरकार विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी यंत्रणेचा वापर करत आहे,” असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस देऊन चौकशीसाठी बोलविण्यात आले. या निषेधार्थ शहर, जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केंद्र सरकारच्या विरोधात पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी चव्हाण बोलत होते. आमदार सतेज पाटील, डॉ. विश्वजित कदम, प्रणिती शिंदे यांच्यासह शहर काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, “ राज्यामध्ये ईडी आणि पैशांच्या मदतीने जबरदस्तीने कायदा मोडून सत्तांतर केले आहे. सर्वोच्च न्यायालयात याबाबत योग्य तो निकाल होईल. पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन झाल्याने शिंदे गटाचे सर्व आमदार निलंबित होतील.  “केंद्र सरकारकडून हुकूमशाही पद्धतीने दहशत निर्माण केली जात आहे. हिम्मत असेल, तर या नेत्यांवर गुन्हा दाखल करून न्यायालयात खटले दाखल करावे. त्यात ते दोषी असतील तर त्यांना शिक्षा होईल. अनेकांचे चार्जशीटदेखील दाखल केले जात नाही, आणि पुरावेही सादर केला जात नाही, ”असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

 

 

Back to top button