पुणे : पुलावरील संरक्षक कठड्याची दुरुस्ती पूर्ण | पुढारी

पुणे : पुलावरील संरक्षक कठड्याची दुरुस्ती पूर्ण

टाकळी हाजी, पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी – निमगाव दुडे या गावांना जोडणारा घोडनदीवरील पूल हा प्रवाशांसाठी धोकादायक असल्याचे वृत्त दैनिक ‘पुढारी’ ने 17 जून रोजी प्रसिद्ध केले होते. पुलाच्या संरक्षक कठड्यासाठी वापरलेले लोखंडी पाईप अनेक ठिकाणी तुटलेले होते, त्या ठिकाणी नवीन पाईप टाकून काम पूर्ण केले आहे.

संबंधित रस्ता अरुंद असून, संरक्षक पाईप जिथे नाहीत तिथे दुर्लक्ष झाले तर अपघाताची शक्यता होती. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या पुलावरील संरक्षक पाइपांकडे दुर्लक्ष का करतात, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित होत होता. टाकळी हाजीपासून निमगाव दुडे, कवठे येमाई, मलठण, रावडेवाडी, मिडगुलवाडी, सविंदणे तसेच पराग कारखाना, मंचर, नारायणगाव, बेल्हा-जेजुरी महामार्ग, अष्टविनायक महामार्ग अशा अनेक रस्त्यांना व गावांना जोडणारा हा रस्ता असल्याने या रस्त्याने मोठ्या प्रमाणात रहदारी असते.

शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी याच पुलावरून शाळेत जात आहेत. उशिरा का होईना, पण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना जाग आली याबद्दल टाकळी हाजीचे माजी सरपंच दामुशेठ घोडे व निमगाव दुडेचे सरपंच अश्विनी गायकवाड यांनी समाधान व्यक्त केले. तसेच दैनिक ‘पुढारी’चे विशेष आभार मानले.

Back to top button