दापोडी : स्मार्ट सिटी कचरामुक्त कधी होणार? | पुढारी

दापोडी : स्मार्ट सिटी कचरामुक्त कधी होणार?

दापोडी : पुढारी वृत्तसेवा : स्मार्ट सिटी अंतर्गत सांगवी, दापोडी, कासारवाडी परिसरात प्रमुख रस्ते व पदपथांची कामे करण्यात आली असून, याठिकाणी स्वच्छता ठेवण्यात येत आहे; मात्र अंतर्गत भागात अनेक ठिकाणी कचरा साठलेला दिसून येत आहे. पावसामुळे कचरा कुजून त्याची दुर्गंधी सुटली आहे. कचर्‍याच्या दुर्गंधीने साथीच्या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी कधी कचरामुक्त होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या सोयीसुविधासाठी लाखो रुपये खर्च करून मूलभूत गरजा पुरविल्या जात आहेत. मात्र कचर्‍याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. मागील आठ दिवसांमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात साथीच्या आजाराने त्रस्त रूग्णांच्या संख्येत भर पडत आहे. खासगी रुग्णालये व शासकीय रुग्णालयांत रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

पिंपळे गुरवकडून कासारवाडीकडे जाताना पवना नदी किनारी उद्यान असून, या लगत पंधरा-वीस दिवसापासून पावसाच्या पाण्यामुळे तळे साचलेे आहे. साचलेल्या पाण्यामध्ये कचरा असल्याने तो कचरा सडल्यामुळे पाण्याला लाल रंग आलेला आहे; तसेच परिसरात दुर्गंधीही पसरली आहे. या दुर्गंधीमुळे साथीच्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासोत्पत्तीमुळे मलेरिया, डेंग्यू सारख्या आजारांनाही सामोरे जावे लागू शकते.

या ठिकाणी अनेक व्यावसायिक कचरा आणून टाकत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. प्रमुख रस्त्यावरील कचरा उचलला जातो. मात्र अडगळीच्या ठिकाणी कचरा साठलेला असतो. साचलेल्या पाण्यात प्लास्टिकच्या बाटल्या, कचर्‍यामुळे दुर्गंधी पसरत आहे. प्रशासन या कचरा समस्येकडे गांभीर्याने पहात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे साथीचे आजार फैलावत आहेत.

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. सांगवी परिसरात साथींच्या आजारामध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सकाळी 9 ते 12 या वेळेत 80 रुग्ण विविध उपचारासाठी येतात. त्यांची तपासणी करून औषधोपचार केले जात आहेत.

Back to top button