बिबवेवाडी परिसरात हरवली खेळाची मैदाने; मुलांच्या खेळण्यावर आली गदा | पुढारी

बिबवेवाडी परिसरात हरवली खेळाची मैदाने; मुलांच्या खेळण्यावर आली गदा

बिबवेवाडी, पुढारी वृत्तसेवा: मुलांनी मैदानी खेळ खेळले पाहिजेत, असा कोरडा धोशा काढणार्‍या अनेक राजकीय महाभागांनी विकासकामांच्या नावाखाली उपनगरांतील विविध क्रीडांगणांवर बांधकामे झाली. साहजिकच, मुलांना खेळण्यासाठी असलेली मैदानेच हरवली आहेत. अलीकडेच पुणे महानगरपालिकेच्या शाळेचे मैदान विकसित करून एका खासगी संस्थेला भाड्याने दिलेले आहे. त्या संस्थेला जर पैसे मोजले, तरच तेथे खेळण्यास परवानगी मिळते.

काही प्रमाणात त्या शाळेतील मुलांना ठरावीक वेळी खेळण्यास मुभा असते; परंतु शालाबाह्य मुले अथवा इतर सायंकाळी सराव करणार्‍या मुलांची मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कुचंबणा होते. सुटीच्या दिवशी मात्र या शाळेच्या मैदानात कोणत्याच वर्गातील मुलांना फिरण्यास देखील परवानगी नाही. महानगरपालिका प्रशासनाचा आडमुठेपणा तत्कालीन माननीयांनी स्वार्थासाठी उभा केलेला आज संपूर्ण भाग गोरगरीब मुलांच्या खेळण्यावर गदा आणत आहे, असे दिसून येते.

‘बिबवेवाडी परिसरातील महानगरपालिकेच्या खुल्या मैदानात आम्ही गेली आठ वर्षे कबड्डीचा सराव करीत होतो. त्यामुळे आम्हाला मोकळे मैदान चांगल्या प्रकारे उपलब्ध होत होते. आता मात्र या ठिकाणी सराव करण्यास बंदी आणली आहे.

                                                                          सनी अवघडे, कबड्डीपटू

या परिसरातील माननीयांनी सीताराम आबाजी बिबवे प्रशालेच्या संपूर्ण परिसरामध्ये विविध प्रकारची बहुउद्देशीय क्रीडासंकुले उभारली आहेत. या क्रीडासंकुलांमुळे इन-डोअर खेळांना चांगल्या प्रकारे वाव मिळतो. परंतु, मोफत व माफक दरात खेळ खेळण्यास मात्र येथे बंदी आणून येथील खेळकर मुलांच्या हक्कावर नक्कीच बंधन आले आहे. माननीयांना विकास करायचा होता. पण, अशा प्रकारचे विकासकाम दाखवून नाकर्तेपणा करणे हे दुर्दैवी आहे.
                                                                        शुभम गिरी, बिबवेवाडी

Back to top button