पिंपरी : अंतिम मतदार यादी आज प्रसिद्ध होणार | पुढारी

पिंपरी : अंतिम मतदार यादी आज प्रसिद्ध होणार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेची प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी गुरुवारी (दि.21) प्रसिद्ध केली जाणार आहे. ती महापालिकेचे www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. तसेच, पालिका भवनातील निवडणूक विभाग आणि सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयात यादी पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे.

महापालिकेने 1 ते 46 प्रभागाची प्रारूप मतदार यादी 23 जूनला प्रसिद्ध केली. त्यावर 3 जुलैपर्यंत हरकती स्वीकारण्यात आल्या. प्रारूप मतदार यादीवर विक्रमी 8 हजार 147 हरकती नोंदविण्यात आल्या. त्यानुसार तब्बल 2 लाख मतदारांची नावे आजूबाजूच्या प्रभागात समाविष्ट करण्यात आल्याच्या तक्रारी आहेत.

हरकतीची पडताळणी करण्यासाठी पालिकेच्या निवडणूक विभागाकडून पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मतदार संघानुसार 235 प्रगणक, 48 सुपरवायझर व 8 क्षेत्रीय अधिकारी, तसेच, लिपिक व संगणक ऑपरेटर यांची नियुक्ती करण्यात आली होती. हरकतदारांच्या घरास प्रत्यक्ष भेट देऊन स्थळ पाहणी करून अर्जाची पडताळणी करण्यात आली.

मतदार आढळून न आल्यास तसेच, आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास त्याचा पंचनामा करण्यात आला. सर्वांधिक तक्रारी या भोसरी विधानसभा मतदार संघातील होत्या. त्या सर्व हरकतींचा निपटारा करण्यात आला आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर गुरूवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. पालिका भवनातील तळमजल्यावरील निवडणूक कार्यालय आणि सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयात अंतिम मतदार यादी पाहण्यासाठी उपलब्ध
असणार आहे.

Back to top button