पिंपरी : अरे बापरे…! सहा महिन्यांत 175 जणांचा अपघाती मृत्यू | पुढारी

पिंपरी : अरे बापरे...! सहा महिन्यांत 175 जणांचा अपघाती मृत्यू

संतोष शिंदे :  पिंपरी : वाढत्या रहदारीमुळे पिंपरी – चिंचवड शहरातील अपघातांची संख्या देखील वाढू लागली आहे. मागील सहा महिन्यांत शहर परिसरात एकूण 175 जणांचा अपघाती मृत्यू झाल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे. यातील बहुतांश जणांचा रस्ते अपघातात जीव गेला आहे. निगडी येथील मुख्यालयाच्या इमारतीत झालेल्या बैठकीत पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच, आगामी काळात अपघात होऊ नयेत, यासाठी काही महत्वाच्या सूचना दिल्याची सूत्रांची माहिती आहे.

पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सर्व पोलिस अधिकार्‍यांची पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच आढावा बैठक संपन्न झाली. यातील विशेष बाब म्हणजे पहिल्यांदाच सर्व पोलिस अधिकारी एकत्रित बोलावण्यात आले होते. या बैठकीत गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला. तसेच, शहर परिसरात होणारे अपघात रोखण्यासाठी चर्चा झाली.

यावेळी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी प्राणांतिक अपघात रोखण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच, त्यांनी अपघातग्रस्त व्यक्तींना तत्काळ मदत मिळवून देण्यासाठी स्थानिक पोलिसांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना देखील केल्या. यासह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश यावेळी देण्यात आला. त्यामुळे आगामी काळात बेशिस्त वाहनचालकांना चाप लावण्यासाठी पोलिसांकडून शहरात ‘स्पेशल ड्राइव्ह’ राबवण्याची दाट शक्यता आहे.

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिलेल्या महत्वाच्या सूचना
अपघात झाल्यानंतर वाहतूक आणि स्थानिक पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांनी भेट द्यावी.

घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर तक्रारीची शहनिशा करून योग्य इसमावर गुन्हा दाखल करण्यात यावा.

तक्रारदार उपलब्ध नसल्यास सरकारतर्फे फिर्याद देऊन कार्यवाही करावी.

 

Back to top button