पिंपरी : तीनशे बेशिस्त कर्मचार्‍यांवर महापालिकेची कारवाई | पुढारी

पिंपरी : तीनशे बेशिस्त कर्मचार्‍यांवर महापालिकेची कारवाई

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तपासणी पथकाने अचानक पाहणी करत विविध विभागांतील तब्बल 297 बेशिस्त कर्मचार्‍यांवर कारवाई केली आहे. या कर्मचार्‍यांच्या विभागप्रमुखांना प्रशासन विभागाने नोटीस बजावली आहे. महापालिकेचे आठ क्षेत्रीय कार्यालय व इतर विभागांमध्ये सुमारे 8 हजार कर्मचारी काम करत आहेत.

हे कर्मचारी कामाच्या ठिकाणी शिस्तीचे पालन करत नसल्याच्या तक्रारी प्रशासन विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार तपासणी पथकाने अचानक पाहणी करत शिस्त मोडणार्‍या कर्मचार्‍यांना दणका दिला आहे. यामध्ये तपासणी पथकाने विविध 15 विभागांची अचानक पाहणी केली. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय, तालेरा रुग्णालय, ब, ग, फ क्षेत्रीय, थेरगाव कर संकलन या विभागांमध्ये अचानक पाहणी दौरा करत तपासणी केली.

यामध्ये काही कर्मचारी गणवेशाविना आढळले. बर्‍याच कर्मचार्‍यांनी पालिकेचे ओळखपत्र दिसेल, असे बाळगले नव्हते. काही कर्मचारी हजेरी लावून कार्यालयात उपस्थित न राहता बाहेर फिरत असल्याचे निदर्शनास आले. या बेशिस्त कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्या कर्मचार्‍यांच्या विभागप्रमुखांना प्रशासन विभागाने नोटीस दिली आहे. नोटीस दिल्याच्या तारखेपासून 15 दिवसांमध्ये विभागप्रमुखांनी यावर खुलासा करण्याचे आदेश प्रशासन विभागाने दिले आहेत, असे सहायक आयुक्त वामन नेमाणे यांनी सांगितले.

Back to top button