राजगुरुनगर : आढळराव पाटील यांना हात-पाय तोडण्याची धमकी

राजगुरुनगर, पुढारी वृत्तसेवा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेल्यावरून शिवसेनेचे उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पुतळा जाळून अश्लील भाषेत शिवीगाळ करून लांडेवाडी येथील घरी येत हात-पाय तोडण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी खेड तालुका शिवसेनेच्या 17 जणांवर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत आंबेगाव तालुक्याचे शिवसेना विभागप्रमुख अंकुश किसन शेवाळे यांनी फिर्याद दिली आहे.
शिवसेनेचे जिल्हा समन्वयक गणेश सांडभोर, माजी जिल्हाप्रमुख राम गावडे, महेंद्र घोलप, अमोल विटकर, सचिन पडवळ, नीलेश वाघमारे, कुमार ताजणे, गोरक्ष सुखाळे, सुरेश चव्हाण, शंकर दाते, नवनाथ कोतवाल, काका कुलकर्णी, दत्ता भांबुरे, तुषार सांडभोर, बबनराव दौंडकर, चंद्रकांत भोर, बाजीराव बुचडे, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांनी आढळराव पाटील हे शिंदे गटात सामील झाल्याने मंगळवारी (दि. 19) पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर येथे बेकायदेशीरपणे एकत्र येत आढळराव पाटील यांचा फोटो गाढवाच्या चेहर्याच्या ठिकाणी लावून त्यावर चप्पलने मारून चपलांचा हार घातला.
तसेच प्रतीकात्मक पुतळा करून त्याचे दहन केले. याशिवाय बदनामी करून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. यासोबतच लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथील घरी येऊन हात-पाय तोडण्याची धमकी दिली. तसेच, रस्त्यावरून प्रवास करणार्या व पायी चालणार्या लोकांना काही वेळ तेथेच थांबण्यासाठी भाग पाडले. त्यामुळे गुन्हे दाखल करण्यात आले. या घटनेचा तपास पोलिस हवालदार संतोष घोलप करीत आहेत.