पुणे : ग्रामीण भागातील रस्त्यांच्या सर्वेक्षणासाठी अभियान | पुढारी

पुणे : ग्रामीण भागातील रस्त्यांच्या सर्वेक्षणासाठी अभियान

वाफगाव, पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांचे सर्वेक्षण आणि पाहणीसाठी जिल्हा परिषदेने 19 जुलै ते 27 जुलै यादरम्यान विशेष अभियान जाहीर केले आहे. अभियानामुळे ग्रामीण भागात नव्याने रस्ते करण्यासाठी माहिती उपलब्ध होऊन त्याचा उपयोग होणार आहे.

ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या मालकीचे इतर जिल्हा मार्ग आणि ग्रामीण मार्ग हे रस्ते आहेत. या रस्त्यांची अंदाजपत्रके आणि कामे पावसाळ्यात केली जात नाहीत. परिणामी, अनेक ठिकाणी मोर्‍यांची जागा व साइड गटारांचा उतार चुकल्याने किंवा चुकीच्या गटारी काढल्याने पावसाळ्यात रस्त्यांचे मोठे नुकसान होते. विशेषत: काळ्या मातीतून जाणारे रस्ते खचून पैसा वाया जातो. पावसाळ्यात या रस्त्यांची पाहणी आणि सर्वेक्षण केल्यास त्याचा नवीन रस्ते करण्यासाठी उपयोग होणार आहे.

सद्य:स्थितीत कामे बंद असल्याने बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा उपयोग व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी सोमवारी (दि. 18) मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना पत्र दिले होते. त्यानंतर हा उपक्रम बांधकाम विभागाला नव्याने रस्ते करण्यासाठी उपयुक्त असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने परिपत्रक काढले. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि बांधकाम उपविभागाच्या उपअभियंत्यांच्या माध्यमातून 19 ते 27 जुलै यादरम्यान जिल्ह्यातील इतर जिल्हा मार्ग आणि ग्रामीण मार्ग रस्त्यांची पाहणी आणि सर्वेक्षण बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी करणार आहेत.

पावसाळ्यातही अधिकारी लागणार कामावर

बर्‍याच वेळेला पावसाळ्यात रस्त्यांची कामे बंद असल्याने अधिकारी दौरे करीत नाहीत. परंतु, या उपक्रमामुळे अधिकार्‍यांना भरपावसात जाऊन या सर्व रस्त्यांची पाहणी करावी लागणार आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामांची अंदाजपत्रके करताना मोर्‍या, गटार, काँक्रिटीकरण, संरक्षक कठडे आदींच्या अचूक जागा निश्चित करता येतील. भविष्यात पावसाळ्यात रस्ते खराब न होण्यास त्याचा लाभ होणार आहे.

लोकप्रतिनिधींचाही सहभाग होणार फायद्याचा

अभियानात स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनीही सहभागी होऊन बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना उपाययोजना सुचविल्यास त्याचा अधिक उपयोग ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी होणार आहे.

Back to top button