पुणे : मंदिरावर येऊन बसतो बिबट्या | पुढारी

पुणे : मंदिरावर येऊन बसतो बिबट्या

मंचर, पुढारी वृत्तसेवा : वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथील शेतकरी राहुल संभाजी डोके यांच्या शेताच्या बाजूला पहाटेच्या वेळी बिबट्यांचा वावर वाढला आहे. या ठिकाणी असलेल्या छोट्या श्री गोसावी बाबांच्या मंदिरावर बिबट्या अनेकदा येऊन बसल्याचे दर्शन शेतकर्‍यांना होत आहे.

शेतकरी राहुल डोके यांच्या राहत्या घराच्या बाजूलाच त्यांची शेती असून शेतीच्या परिसरात उसाचे क्षेत्र जास्त असल्याने येथे बिबट्यांचा वावर वाढला आहे. गेल्या आठवड्यात शेतकरी राहुल डोके यांना बिबट्याने अनेकदा दर्शन दिले आहे.

शेतकरी राहुल डोके यांच्या शेताच्या शेजारी असलेल्या श्री गोसावी बाबाच्या मंदिरावर पहाटेच्या वेळी बिबट्या येऊन बसत आहे. बिबट्याचा या ठिकाणी वावर वाढल्याने तो केव्हाही मनुष्यावर हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळे वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी शेतकरी राहुल डोके यांनी केली आहे.

Back to top button