पुणे : दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला, दोन वेगवेगळ्या घटनांत दोन लाखांचा ऐवज चोरीला | पुढारी

पुणे : दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला, दोन वेगवेगळ्या घटनांत दोन लाखांचा ऐवज चोरीला

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील बसप्रवासादरम्यान महिलांचे दागिने चोरीला जाण्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून वाढीस लागल्या आहेत. भोसरी ते भेकराईनगर व स्वारगेट ते पूरम चौक असा प्रवास करताना दोन महिलांचे दागिने चोरीला गेले.
याप्रकरणी, हडपसर आणि स्वारगेट पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

17 जुलैला दुपारी प्रणाली गाडगे (वय 26, रा. राजगुरूनगर) ह्या भोसरी टर्मिनल ते भेकराईनगर हडपसर असा पीएमपीएमएल बसने प्रवास करत होत्या. त्या वेळी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या पर्समधून दीड लाख रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण व आठशे रुपयांची रोकड असा 1 लाख 51 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला.

चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर गाडगे यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कोथरूड येथील 65 वर्षीय महिला 18 जुलैला दुपारी चार वाजताच्या सुमारास स्वारगेट बस थांबा ते पूरम चौक असा प्रवास करत होत्या. त्या वेळी चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन फिर्यादींची नजर चुकवून त्यांच्या हातातील 70 हजार रुपये किंमतीची सोन्याची बांगडी चोरी केली. चोरी झाल्याचे निदर्शनास येताच फिर्यादींनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

प्रवासातील महिलांच्या ऐवजावर चोरट्यांचा डोळा
पीएमपीएल बस प्रवासादरम्यान महिलांचे दागिने, रोकड चोरी जाण्याच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. प्रामुख्याने ज्येष्ठ महिलांना चोरट्यांकडून टार्गेट केले जाते आहे. बसमधील गर्दी व चढण्या-उतरण्यास मदत करण्याच्या बहाण्याने चोरटे ऐवज चोरी करत आहेत. संघटीतपणे चोरट्यांच्या टोळ्या प्रवाशांचा ऐवज लंपास करत आहेत.

Back to top button