पुणे : बोगस डॉक्टरवर आरोग्य विभाग, पोलिसांची कारवाई | पुढारी

पुणे : बोगस डॉक्टरवर आरोग्य विभाग, पोलिसांची कारवाई

नारायणगाव, पुढारी वृत्तसेवा : वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना वैद्यकीय व्यावसायिक असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करणार्‍या नारायणगाव येथील एका बोगस डॉक्टरवर आरोग्य विभाग व पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई करून गुन्हा दाखल केल्याची माहिती नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

अनुपकुमार हरिदीप मुजुमदार, (रा. काजल, ता. बरासत, जिल्हा -चोविस परगणा राज्य- कलकत्ता, सध्या रा. मुक्ताबाई मंदिर नारायणगाव) बोगस डॉक्टरचे नाव आहे. फिर्याद वारुळवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. चैताली कांगुणे यांनी दिली आहे. डॉ. चैताली यांना नारायणगाव येथे एक बोगस डॉक्टर कुठलेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना वैद्यकीय व्यवसाय करून नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचे समजले. डॉ. चैताली यांनी पोलिसांच्या मदतीने नारायणगावात तपासणी केली.

ग्रामपंचायतीसमोरील बाजारपेठ गल्लीत एका खोलीसमोर निळ्या रंगाचा बोर्ड दिसला, त्यावर डॉक्टर मुजुमदार दवाखाना असे लिहिलेले होते, म्हणून फिर्यादी हे आपल्या स्टाफसह सदर रूममध्ये गेले असता तेथे एक इसम हा लोखंडी खाटेवर तेथील दुसर्‍या इसमावर औषधोपचार करत असताना आढळला.

तेव्हा फिर्यादींनी त्याला आपण प्राथमिक आरोग्य केंद्र वारूळवाडी येथील वैद्यकीय अधिकारी असल्याचे सांगून बरोबर स्टाफ सहकारी कर्मचारी आहेत, असे सांगून त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र आहे का?,असे विचारले. त्या वेळी सदर इसमाने असे कोणतेही प्रमाणपत्र नसल्याचे सांगितले. त्यानुसार, फिर्यादींनी दोन पंचांना समक्ष बोलवून पंचनामा केला. त्यामध्ये काही हॉस्पिटलची सामग्री मिळून आली, त्यामुळे सदर डॉक्टर बोगस वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना वैद्यकीय व्यावसायिक असल्याचे आढळून आले. त्यानुसार, पोलिसांनी कलम 420 व महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 मधील कलम 33 अ (2) नुसार गुन्हा दाखल केला. तपास पोलिस उपनिरीक्षक सनील धनवे करीत आहेत.

Back to top button