पिंपरी : व्हॉट्सअ‍ॅप कॉलही अंगलट, व्हॉट्सअ‍ॅप कॉलमुळे दोन वैद्यकीय अधिकारी अडचणीत | पुढारी

पिंपरी : व्हॉट्सअ‍ॅप कॉलही अंगलट, व्हॉट्सअ‍ॅप कॉलमुळे दोन वैद्यकीय अधिकारी अडचणीत

संतोष शिंदे : पिंपरी : सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) आणि कॉल रेकॉर्डिंग होत नसल्याच्या कारणांमुळे अलीकडे सरकारी कर्मचारी, अधिकारी व्हॉट्सअ‍ॅप कॉलचा वापर करू लागले आहेत. मात्र, औंध येथील जिल्हा रुग्णालयातील लाच प्रकरणात केवळ व्हॉट्सअ‍ॅप कॉलमुळे दोन वैद्यकीय अधिकारी अडचणीत आल्याचे समोर आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप कॉलवर ठरणार्‍या ‘डील’ अंगलट येण्याची शक्यता आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिक्रापूर येथील सोनोग्राफी सेंटरच्या प्रमाणपत्राचे नूतनीकरण करण्यासाठी औंध येथील जिल्हा रुग्णलयातील डॉक्टरांनी 40 हजारांच्या लाचेची मागणी केली. लाचलुचपत विभागाकडे तक्रार आल्यानंतर त्यांनी लिपिक तथा सहायक अधीक्षक संजय सीताराम कडाळे (45) याला तडजोडीअंती 12 हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले.

मात्र, यामध्ये आणखी काही जण सहभागी असल्याचा संशय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांना होता. त्यामुळे त्यांनी संजय कडाळे याला स्पीकर ऑन करून त्याच्या अधिकार्‍यांशी संभाषण करण्यास सांगितले. त्यानुसार, सर्वप्रथम कडाळे याने प्रशासकीय अधिकारी महादेव गिरी (52) याला नियमित कॉल केला.

फोनवर कामाच्या अनुषंगाने इतर चर्चा केल्यानंतर कडाळे याने गिरी याला, तक्रारदार आता बारा घेऊन आलाय काय करू, अशी विचारणा केली. त्या वेळी गिरी याने समोरून बरं… हम्म, असा प्रतिसाद दिला. तसेच, उद्या बोलू आपण, एक मिनिटात व्हाट्स अ‍ॅप कॉल करतो, असे म्हणून फोन कट केला. या संभाषणामुळे एसीबीची खात्री झाल्याने गिरी याची उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर कडाळे याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधव कनकवळे (50) याच्या मोबाईलवर व्हाट्स अ‍ॅप कॉल केला.

तक्रारदार बारा हजार घेऊन आल्याचे सांगताच कनकवळे याने, बर…बर ठीक आहे, असा प्रतिसाद दिला. कडाळे याने बाकी रक्कम उद्या मिळणार असल्याचे सांगितल्यानंतर कनकवळे म्हणाला की, अच्छा ठीक आहे, घ्या… काही प्रॉब्लेम नाही… काही इश्यू नाही. त्यानंतर पूर्ण पैसे कोणाकडे द्यावेत या बाबत चर्चा झाल्यानंतर कनकवळे याने पैसे माझ्याकडे किंवा ए.ओ. सरांकडे द्या, अशी सूचना कडाळे याला केली. या संभाषणामुळे लाचलुचपत अधिकार्‍यांनी कनकवळे याला देखील अटक केली. केवळ फोनवर झालेल्या या संभाषणामुळे कनकवळे आणि गिरी हे दोघे अडचणीत आले. त्यामुळे लाचलुचपत विभागाची शासनाच्या विभांगावर ‘नजर’ असल्याचे अधोरेखित झाले आहे.

औंध जिल्हा रुग्णालयातील लाच प्रकरणात व्हॉट्सअ‍ॅपमुळे वैद्यकीय अधिकारी अडचणीत, व्हॉईस रेकॉर्डरमध्ये रेकॉर्डिंग
आरोपी संजय सीताराम कडाळे याला सापळा रचून पकडल्यानंतर आरोपी कनकवळे आणि गिरी यांच्या मोबाईलवर कॉल करण्यात आले. मात्र, व्हॉट्सअ‍ॅप कॉलचे रेकॉर्डिंग होत नसल्याने लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांनी हे संभाषण व्हॉईस रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड केले. आगामी काळात हेच रेकॉर्डिंग आरोपींच्या विरोधात न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. आरोपींनी या रेकॉर्डिंगला आव्हान दिल्यास व्हॉईस सॅम्पलिंग प्रक्रियेद्वारे उत्तर दिले जाणार असल्याचे एका एसीबीच्या अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

…अन् राहत्या घरातून केली उचलबांगडी
लाचलुचपत विभागाचा सांगवीत छापा पडला, त्या वेळी आरोपी माधव कनकवळे हा त्याच्या घरी होता. घरी असताना त्याने आरोपी संजय कडाळे याच्या फोनला प्रतिसाद दिला. त्यामुळे लाचलुचपत विभागाने कनकवळे याची राहत्या घरातून उचलबांगडी केली.

वेगवेगळे अ‍ॅपही उपलब्ध
रेकॉर्डिंग होत नसल्याने अनेकांकडून नियमित कॉलपेक्षा व्हॉटसअ‍ॅप कॉलचा वापर जास्त होत आहे. मात्र, अलीकडे या व्हॉट्सअ‍ॅप कॉलचे रेकॉर्डिंग करण्यासाठी देखील वेगवेगळे अ‍ॅप उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात व्हॉट्सअ‍ॅप कॉलचे रेकॉर्डिंग देखील पुरावा म्हणून वापरले जाणार आहे.

Back to top button