पुणे : पर्यटनस्थळे पुन्हा ‘खुली’ | पुढारी

पुणे : पर्यटनस्थळे पुन्हा ‘खुली’

पुणे : पुढारी वृत्तसेवा : हवामान विभागाने जिल्ह्यातील घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गड-किल्ले, पर्यटनस्थळांवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी 13 जुलै रोजी जमावबंदीचे आदेश दिले होते. मात्र, पावसाचा जोर ओसरल्याने हा आदेश मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे आता पर्यटकांना पावसाळी वातावरणाचा मनमुराद आनंद लुटता येईल.

हवामान विभागाने गेल्या आठवड्यात जिल्ह्याला मुसळधार पावसाचा अर्थात रेड अलर्टचा इशारा दिला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये, म्हणून हे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले होते. त्यानुसार, जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, गड-किल्ले या ठिकाणी एक किलोमीटर परिसरात कोणत्याही प्रकारची वाहने घेऊन जाण्यास आणि पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना जाण्यास मज्जाव करण्यात आला होता.

पावसाळ्यात नदीकाठची गावे, धरणांच्या पाणलोट क्षेत्राच्या परिसरातील ठिकाणे, गड-किल्ले, पर्यटन स्थळे, डोंगरातून कोसळणारे धबधबे अशा निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत आहे. या ठिकाणी पहिल्यांदाच जाणार असाल आणि त्या ठिकाणी पाऊस, दाट धुके असेल, तर स्थानिक गावातील एखादा मार्गदर्शक सोबत न्यावा.

पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत असल्याने दाट धुके असल्यास गाडीचे दिवे आणि पार्किंग दिवे चालू ठेवून गाडी चालवावी. पर्यटनस्थळी सुरक्षारक्षक भिंती, लोखंडी कडे नसल्याने धबधब्याच्या प्रवाहात उतरू नये, सर्व पर्यटकांनी सायंकाळी चार वाजण्यापूर्वी परतावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जमावबंदीचे आदेश मागे

जिल्ह्यात संकटकाळी 1077 या टोल फ्री आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 020-26123371 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button