पुणे: अप्पर-कोंढवा भागातील रस्त्याची झाली चाळण | पुढारी

पुणे: अप्पर-कोंढवा भागातील रस्त्याची झाली चाळण

बिबवेवाडी : अप्पर डेपोपासून पासलकर चौक, कोंढवा, शांतीनगर, गंगाधाम चौक आदी भागांत जाणार्‍या रस्त्यावर असंख्य खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या रस्त्यावर गेले दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा विभागाने नवीन मोठी पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे हे काम बर्‍याच अंशी अर्धवट केलेले आहे. ठेकेदारांनी केलेल्या कामाकडे महानगरपालिकेचे कोणतेच अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करत नाहीत. त्यामुळे अशा अर्धवट कामाचा ताण या परिसरातून ये-जा करणार्‍यांना सहन करावा लागत आहे. साहजिकच रस्त्यांवरील खड्डे भरून घेऊन रस्ता पूर्ववत करावा अशी मागणी होत आहे.

अप्पर कोंढवा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत, त्याबाबत प्रशासन मात्र कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. मनपाचे अधिकारी इकडे फिरकण्याचे नाव घेत नाहीत, जर येथील खड्डे तातडीने दुरुस्त केले नाही, तर ग्राहक संघटनेच्या वतीने तीव— आंदोलन केले जाईल.
– मिलिंद राजहंस, अध्यक्ष, ग्राहक हक्क समिती, पुणे शहर

बिबवेवाडी परिसरात रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने भरून रस्ता पूर्ववत करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदार व अधिकार्‍यांना दिल्या आहेत. लवकरच नागरिकांची होणारी गैरसोय दूर होईल.
– अनिल सोनवणे, सहायक आयुक्त, बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालय, पुणे

Back to top button