

खडकवासला : पावसाळ्यातील पाण्याचा निचरा होण्यासाठी धायरी, सिंहगड रस्ता परिसरातील पावसाळी लाइनमध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमणे वाढली आहेत, तसेच कचरा, राडारोड्याचे ढिगारे पडले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर तसेच नागरी वस्त्यांमध्ये शिरत आहे. सर्वांत गंभीर स्थिती धारेश्वर मंदिर परिसर, रायकरमळा, नर्हे रोड आदी ठिकाणी आहे. पाण्यामुळे रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
ग्रामपंचायत काळात रस्ते तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पावसाळी लाइन करण्यात आली होती. मात्र, पालिकेच्या दुर्लक्षामुळे बहुतेक ठिकाणी पावसाळी लाइन अतिक्रमणे व राडारोड्यामुळे गाडली गेली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून संततधार सुरू आहे. त्यामुळे रस्त्यांवरून पाणी वाहत आहे. वाहतूक कोंडी, अपघात अशा समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. याकडे माजी सरपंच आशा बेनकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.