पुणे : डोणला रानगव्यांकडून भातरोपांचे नुकसान

मंचर, पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील डोण येथे शेतकर्यांनी लागवडीसाठी तयार केलेल्या भातरोपांचे रानगव्यांनी नुकसान केले आहे. याबाबत वन विभागाने अद्यापही पंचनामे केले नसल्याने किसान सभेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
डोण येथे गेल्या काही दिवसांपासून चार ते पाच रानगव्यांचा कळप आला आहे. कळपाने शेतकरी चिंतामण तुळा गवारी, रामा होना गवारी, देवजी तुकाराम गवारी, चिंतामण तुळा गवारी, सुनील हिरामण गवारी, नामदेव महादू गवारी, सखाराम भिका गवारी, कृष्णा महादू गवारी आदी शेतकर्यांच्या भातरोपांचे मोठे नुकसान केले आहे. आदिवासी भागातील शेतकर्यांचे भात हे महत्त्वाचे पीक असून, कुटुंबाची उपजीविका ही याच पिकावर अवलंबून आहे.
रानगव्यांनी भातरोपांचे नुकसान केल्याने शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे वन विभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून शेतकर्यांना मदत मिळवून द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकर्यांनी केली आहे. शेतकरी चिंतामण गवारी यांनी घोडेगाव वन विभागाच्या कार्यालयात पत्रव्यवहार केल्याचे सांगितले.