पिंपरी: पुनावळेतील रस्त्याचे डांबर गेले वाहून; सेवा रस्त्यावर जागोजागी खड्डे | पुढारी

पिंपरी: पुनावळेतील रस्त्याचे डांबर गेले वाहून; सेवा रस्त्यावर जागोजागी खड्डे

ताथवडे : मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील अनेक रस्त्यांचे डांबर वाहून गेले आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याचे दिसत आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील पुण्याच्या दिशेने जाणार्‍या पुनावळेतील नरहरी सोसायटी जवळील सेवा रस्ता हा खड्डेमय झाला असल्यामुळे चालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे सर्व विकासकामांची पोलखोल झाली आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील सेवा रस्त्यावरून नेहमी वाहनाची वर्दळ असते.

अनेकवेळा येथील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. पावसाळा जवळ आला की रस्त्याची डागडुजी करण्यात येते. जिथे गरज आहे तिथे रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येते. काही ठिकाणचे खड्डे बुजवले गेले आहेत. परंतु, हे काम इतके निकृष्ट दर्जाचे होते की पहिल्या आठवड्याच्या पावसातच येथील नव्याने बनवण्यात आलेल्या रस्त्यावरील डांबर वाहून गेले आहे. ज्येष्ठांना या ठिकाणाहून प्रवास करताना मणक्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खड्ड्यांमधील पाण्यामुळे वाहनचालकांना अंदाज लागत नसल्याने दुचाकी घसरून पडल्याच्या काही घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन येथील रस्त्याची डागडुजी करावी, अशी अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करीत आहेत.

खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान

रस्त्यावर मोठंमोठे खड्डे पडले आहेत. खड्डे इतके मोठे आहेत की यामध्ये पावसाचे पाणी साचून तळे तयार झाल्याचे भासत आहे. या खड्डयांमुळे वाहनचालकांची डोकेदुखी वाढत असून वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. दुचाकीचा तोल जाऊन दुचाकी पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत.

Back to top button