पुणे, पुढारी वृत्तसेवा: पेंटर असलेल्या दोन तरुणांना व्यावसायात तोटा झाल्यानंतर त्यांनी थेट चोरीचा मार्ग निवडल्याची धक्कादायक प्रकार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उघडकीस आणली आहे. दोघांना जेरबंद करून तब्बल 12 मोबाईल जप्त करत 7 गुन्ह्यांची उकल केली आहे. युनिट तीनच्या पथकाने ही कारवाई केली आहे. राज अंगनुराम गौतम (वय 26, रा. कात्रज) आणि विजय शिवमुरत राम कुमार (वय 20, रा. कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. शहरात मोबाईल हिसकावण्यासोबतच लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेकडून हद्दीत गस्त घातली जात आहे. युनिट तीनचे पथक अलंकार भागातील गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. यादरम्यान, कर्मचारी संजिव कंळबे यांना बातमीदारामार्फत या दोघांची माहिती मिळाली. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक अनिता मोरे व त्यांच्या पथकाने दोघांना सापळा रचून पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानतंर त्यांनी शहरातील विविध भागांतून चोरलेले 2 लाख 16 हजार रुपयांचे 12 मोबाईल जप्त केले आहेत. तर, एक दुचाकी जप्त केली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक अनिता मोरे, उपनिरीक्षक गुंगा जगताप, कर्मचारी संतोष क्षीरसागर, राजेंद्र मारणे यांच्या पथकाने केली आहे.