पुणे : बादलला यूपीतून बेड्या; खून करून रोकड, सोने घेऊन झाला होता पसार | पुढारी

पुणे : बादलला यूपीतून बेड्या; खून करून रोकड, सोने घेऊन झाला होता पसार

पुणे, पुढारी वृत्तसेवा : महिलेचा खून करून अंगावरील दागिने घेऊन थेट उत्तर प्रदेश गाठणार्‍या एकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून बेड्या ठोकल्या आहेत. तेथे ट्रान्झिट रिमांड घेऊन पुण्यातील न्यायालयात हजर केले असता त्याला 21 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. या वेळी चोरून नेलेले 2 लाख रुपये आणि 6 तोळे 8 ग्रॅम दागिने जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्त सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. बादल ऊर्फ सुग्गा बनवारी बिंद (वय 27, रा. ग्राम दुबावल, थाना सराज इनायत, जि. प्रयागराज, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पारूबाई किसन सावंत (वय 65, रा. मेनका स्टोन कंपनी, भिलारेवाडी, कात्रज) यांचा गळा दाबून खून करण्यात आला होता. याबाबत त्यांच्या भावाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दि. 11 जुलैला सायंकाळी 7 ते 12 जुलै रोजी सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान पारूबाई सावंत या घरात एकट्या होत्या. या काळात आरोपीने त्यांच्या घरात शिरून त्यांचा गळा दाबून खून केला. घरातील रोकड आणि त्यांच्या अंगावरील दागिने चोरून नेले होते. त्याच दिवसापासून आरोपी बादल फरारी झाला. त्याच्यावर संशयित म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. बादल उत्तर प्रदेशात पळून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर उपनिरीक्षक धीरज गुप्ता, कर्मचारी धनाजी धोत्रे, राहुल तांबे, आशिष गायकवाड तेथे गेले. त्याला 15 जुलैला अटक करून स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी चोरी केलेला ऐवजही त्याच्याकडून जप्त करण्यात आल्याचे तपास अधिकारी गुन्हे निरीक्षक संगीता यादव यांनी सांगितले.

खून करून बाहेरून कुलूप लावून बादलला हा फरार झाला होता. शेजारील नागरिकांनी त्याला कुठे चालला, अशी विचारणा देखील केली होती. त्या वेळी त्याने आपण एका वाढदिवसाला निघाल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात त्या वेळी तो खून करून पळून गेल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. आता त्याला याप्रकरणी पथकाने अटक केली आहे.
– जगन्नाथ कळसकर, वरिष्ठ निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलिस ठाणे

Back to top button