पुणे, पुढारी वृत्तसेवा: विद्यार्थी वाहतूक करणार्या स्कूल बसचालकाने शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बसचालकाने विद्यार्थिनीला आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांकडून स्कूल बसचालकाला अटक करण्यात आली. सोमेश्वर घुले पाटील (वय 35, रा. वडाचीवाडी, उंड्री) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत 15 वर्षीय पीडित मुलीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमेश्वर हा विद्यार्थी वाहतूक करतो. फिर्यादी मुलीसोबत त्यातूनच त्याची ओळख होती.
सोमेश्वरने तिला आमिष दाखवत मुलगी सज्ञान नसल्याचा गैरफायदा घेतला, अशी माहिती कोंढवा पोलिसांनी दिली. त्याने शाळकरी मुलीवर बलात्कार केला. चार दिवसांपूर्वी मुलगी शाळेतून उशिरा घरी आली तेव्हा तिच्या वडिलांनी तिची चौकशी केली. तेव्हा स्कूल बसचालकाने तिला आमिष दाखवून बलात्कार केल्याचे उघडकीस आले, त्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, तेव्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सोमेश्वरला अटक केली असून सहायक पोलिस निरीक्षक शिंदे तपास करत आहेत.