पुणे : अकरावीसाठी भाग दोनचे वेळापत्रक जाहीर | पुढारी

पुणे : अकरावीसाठी भाग दोनचे वेळापत्रक जाहीर

पुणे; पुढारी वृत्तसेवा: अकरावी प्रवेशाचा कट ऑफ, गुणवत्ता यादी तसेच प्रवेश प्रक्रिया सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या निकालानंतर जाहीर होईल. परंतु येत्या 22 जुलैपासून विद्यार्थ्यांना अर्जाचा दुसरा भाग येणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक महेश पालकर यांनी ही बाब स्पष्ट केली आहे. राज्यात 17 जूनला दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यानंतर पुढील पंधरा दिवसांमध्ये प्रवेश अर्जांचा दुसरा भाग भरण्याची प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, निकाल लागून आता एक महिना होत आला तरी अद्याप विद्यार्थ्यांना अर्जाचा दुसरा भाग भरण्याची संधी मिळालेली नव्हती.

निकाल लागण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना अर्जाचा पहिला भाग भरण्यासाठी मुदत दिल्याने जवळपास दीड महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यांनी अर्जाचा पहिला भाग भरला आहे. अर्जाच्या दुसर्‍या भागात विद्यार्थ्यांना मिळालेले गुण, त्यांची प्रवेशाची शाखा, त्यांना अपेक्षित असलेले महाविद्यालय, अशी माहिती भरली जाणार आहे. ही माहिती भरल्याशिवाय प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून भाग दोन भरण्यासाठी संधी देण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली आहे.परंतु प्रत्यक्ष प्रवेशासाठीचे वेळापत्रक सीबीएसई निकालानंतर जाहीर केले जाईल असे पालकर यांनी स्पष्ट केले आहे.

 

Back to top button