पुणे : महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभाग? भाजपच्या हालचाली | पुढारी

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभाग? भाजपच्या हालचाली

पुणे, पुढारी वृत्तसेवा: आगामी महापालिका निवडणुकीसाठी पुन्हा चार सदस्यीय प्रभाग रचना करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
राज्यात पुन्हा सत्ता आल्यानंतर भाजपकडून यासंबंधीच्या कायदेशीर बाजू तपासण्याचे काम सुरू झाले असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरच प्रभागरचना चार सदस्यीय होणार की तीन सदस्यीय कायम राहणार, हे ठरणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील जवळपास 18 महापालिकांच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. या निवडणुकांसाठी राज्य शासनाने तीन सदस्यीय प्रभाग रचना निश्चित केली. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हरकती-सूचनांसह अंतिम प्रभाग रचनाही जाहीर झाल्या. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन आता पुन्हा शिवसेनेचे शिंदे गट आणि भाजपची सत्ता आली आहे.

2017 च्या महापालिका निवडणुकीसाठी भाजपने चार सदस्यीय प्रभाग रचना केली होती. त्यामुळे अनेक महापालिकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले होते. त्यामुळे आता भाजपच्याच नेत्यांकडून चार सदस्यीय प्रभाग रचना करावी, अशी मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे भाजपकडून नव्याने पुन्हा चार सदस्यीय प्रभाग रचना करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यासाठी कायदेशीर बाबी तपासल्या जाणार आहेत. त्यानुसार आताची प्रभाग रचना रद्द करून पुन्हा नव्याने चार सदस्यीय रचना करता येईल का, याची चाचपणी केली जात आहे. तसे शक्य असल्यास भाजपकडून यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल, असेही सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.

न्यायालयाचा निर्णय महत्त्वाचा
राज्यातील महापालिकांसह अन्य इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लांबलेल्या निवडणुका लवकरात लवकर घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला आहे. त्यानुसार आता आयोगाने जवळपास सर्व तयारी पूर्ण केली आहे. त्यानुसार सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे. मात्र, चार सदस्यीय प्रभाग रचना करण्यासाठी कालावधी लागणार असल्याने या निवडणुका वेळेत घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे चारचा प्रभाग करण्याचा निर्णय झाला, तर त्याचा निवडणुकीच्या वेळापत्रकावर होणारा परिणाम लक्षात घ्यावा लागणार आहे. याबाबत न्यायालय नक्की काय आदेश देणार, यावरच चार सदस्यांच्या प्रभाग रचनेचे भवितव्य ठरणार आहे.

 

Back to top button