पुणेकर शिवसैनिक शिंदेंंच्या भेटीला; पोलिसांच्या कडक सुरक्षेत मुुंबईत दाखल | पुढारी

पुणेकर शिवसैनिक शिंदेंंच्या भेटीला; पोलिसांच्या कडक सुरक्षेत मुुंबईत दाखल

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते सोमवारी माजी नगरसेवक नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झाले. अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी देण्यात येणारी बडदास्त देत पोलिसांची पायलट कारसह मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाण्यासाठी सुरक्षा पुरविण्यात आली. शिंदे यांनी आमदारांसह शिवसेनेतून बंड केल्यानंतर, राज्याच्या वेगवेगळ्या भागातून पाठिंबा मिळू लागला आहे. ते पंढरपूरला आषाढी एकादशीला पूजेसाठी जात असताना, हडपसर येथे भानगिरे यांनी त्यांचा सत्कार केला होता. भानगिरे, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अजय भोसले, रमेश कोंडे, किरण साळी, उल्हास तुपे, बाळासाहेब भानगिरे, निलेश गिरमे यांच्यासह अनेक कार्यकर्ते शिंदे यांना भेटण्यासाठी सोमवारी सकाळी मुंबईला रवाना झाले.

तेथे जाण्यासाठी त्यांना मार्ग मिळावा, म्हणून पोलिसांनी तीन-चार गाड्या सुरक्षेसाठी दिल्या. त्यामुळे त्यांना विनासायास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचता आले. शिवसेनेच्या काही माजी नगरसेवकांनी व पदाधिकार्‍यांनी गेल्या आठवड्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत ते पक्षासोबत असल्याची ग्वाही दिली होती. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातून मोठ्या संख्येने शिवसैनिक सोमवारी मुंबईला शिंदे यांच्या भेटीला गेल्यामुळे, पुण्यातील शिवसेनेतही मोठी फूट पडणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

शहर प्रमुखपदी नाना भानगिरे यांची निवड
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाच्या पुणे शहर प्रमुखपदी माजी नगरसेवक नाना भानगिरे यांची निवड सोमवारी रात्री करण्यात आली. सहसंपर्कप्रमुख म्हणून शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अजय भोसले यांना नियुक्त करण्यात आले आहे. भानगिरे तीन वेळा शिवसेनेचे नगरसेवक म्हणून पुणे महापालिकेत निवडून आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघाची निवडणूकही लढवली होती. शिंदे यांनी शिवसेना सोडल्यानंतर पुण्यातून भानगिरे यांनी सर्वप्रथम त्यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यांच्या गटात पुणे शहरातील शिवसेनेचे काही माजी नगरसेवक व पदाधिकारी लवकरच येतील, असा दावा भानगिरे यांनी केला.

 

Back to top button