पुणे : सिंहगडावर शुकशुकाट; राजगड बहरला | पुढारी

पुणे : सिंहगडावर शुकशुकाट; राजगड बहरला

वेल्हे, पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टीमुळे सुरक्षेसाठी गुरुवारपासून आज रविवार (दि. 17) पर्यंत गडकोटांसह पर्यटनस्थळे, धबधबे, धरण परिसरात पर्यटकांना मनाई करण्यात आली होती. त्यामुळे सिंहगडावर शुकशुकाट होता. मात्र, धो-धो पावसातही राजगडावर शेकडो पर्यटकांनी गर्दी केली होती. खडकवासला, पानशेत धरण परिसरही पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाला होता.

गेल्या आठ दिवसांपासून कोसळणार्‍या पावसाचा जोर रविवारी ओसरला. सुटीमुळे सकाळपासून पुणे-पानशेत रस्त्यावर हजारो पर्यटकांच्या रांगा लागल्या होत्या. धोकादायक घाट, धरण, ओढ्याच्या काठावर पर्यटक मौजमजा करीत होते. सकाळपासून पर्यटकांनी सिंहगडाकडे धाव घेतली. मात्र, गडाच्या पायथ्याशी गोळेवाडी व अवसरवाडी तपासणी नाक्यावर, तसेच आतकरवाडी पायी मार्गावरून हजारो पर्यटकांना माघारी जावे लागले.

सिंहगड वन विभागाचे वनपरिमंडल अधिकारी बाळासाहेब लटके, वनरक्षक बाबासाहेब जिवडे यांच्यासह सुरक्षा रक्षक तैनात होते. गड बंद असल्याचे सुचना फलक नसल्याने सुरक्षा रक्षकांना रस्त्यावर उभे राहून गडावर जाण्यास मनाई असल्याचे सांगण्यासाठी दिवसभर कसरत करावी लागली. गडकिल्ल्यांवर अतिवृष्टीमुळे जीवितहानीच्या धोक्यामुळे 14 ते 17 जुलैपर्यंत प्रशासनाने मनाई केली होती. सिंहगडावर मनाई आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी घाट रस्त्यासह पायी मार्गावर वन खात्याने पहारा ठेवला. दुसरीकडे मुसळधार पाऊस व दाट धुक्यात हरवलेल्या राजगडावर मनाई असतानाही पर्यटकांची वर्दळ होती. दिवसभरात जवळपास एक हजारांवर पर्यटकांनी गर्दी केली होती. गडाच्या पायथ्याला पाल खुर्द येथील खंडोबा माळावरील वाहनतळावर गडावर जाणार्‍या पर्यटकांच्या दुचाकी, चारचाकी वाहनांच्या गर्दी झाली होती.

Back to top button