पावसामुळे कोर्‍हाळे-शिरष्णे रस्त्यावर खड्डेच खड्डे | पुढारी

पावसामुळे कोर्‍हाळे-शिरष्णे रस्त्यावर खड्डेच खड्डे

बारामती : पुढारी वृत्तसेवा : कोर्‍हाळे बुद्रुक ते शिरष्णे हा रस्ता सध्या खड्ड्यात गेला आहे. या रस्त्यावर भले मोठे खड्डे पडल्याने पावसाच्या पाण्याने वाहनचालकांची अधिकच तारांबळ उडत आहे. फलटण, सांगवी या भागाकडे जाणारा हा अत्यंत महत्त्वाचा व जवळचा मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते.

कोर्‍हाळे बाजारपेठेशी या भागातील कुरणेवाडी, थोपटेवाडी, शिरष्णे आदी गावे जोडली गेली आहेत. त्यामुळे नागरिकांचे रोजचे येणे-जाणे असते. परंतु, या रस्त्याची गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. सगळा रस्ताच खड्ड्यात गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

या भल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साठले आहे. त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही. त्यात दुचाकीचालकांचे वाहन अडकून पडून अपघात घडत आहेत. चारचाकी वाहनचालकांचीही अवस्था यापेक्षा वेगळी नाही. एकतर एका बाजूला पाण्याचा फाटा आणि दुसर्‍या बाजूला रस्त्याशेजारी असणारी घरे, यामुळे हा रस्ता नेहमीच वाहतुकीसाठी धोकादायक ठरतो. त्यात समोरून मोठे वाहन आल्यास दुसरे वाहन बसत नाही.

या स्थितीत नागरिकांपुढे पर्याय नसल्याने रस्त्यावरून ये-जा करावीच लागते. त्यातून एखादा मोठा अपघात झाला, तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न परिसरातील नागरिक आणि वाहनचालक करीत आहेत.

Back to top button