पुणे : कर्नाटकातील दर्जाहिन पावटा बाजारात; मार्केट यार्डात 100 ट्रक शेतमाल दाखल | पुढारी

पुणे : कर्नाटकातील दर्जाहिन पावटा बाजारात; मार्केट यार्डात 100 ट्रक शेतमाल दाखल

पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डात कर्नाटक येथून मोठ्या प्रमाणात पावटा दाखल होत आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे वाहतुकीदरम्यान पावट्याच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. बाजारात हलक्या तसेच दर्जाहिन पावट्याचे प्रमाण जास्त आहे. परिणामी त्यांच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. हिमाचल प्रदेश येथील मटारचा हंगाम संपला असून बाजारात बेळगाव व धारवाड येथून मटार दाखल होत आहे.

पावसामुळे याठिकाणीही हलक्या प्रतीचा माल जास्त आहे. तर, गुजरात येथे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने येथील बाजारपेठांमध्ये पाठविण्यात येणारा कोबी शेतकर्‍यांनी पुण्यातील बाजारपेठांमध्ये पाठविण्यास सुरवात केली आहे. मागणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कोबी बाजारात दाखल होत असल्याने कोबीच्या दरातही दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे.

पावसाच्या संततधारेचा पिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. यामध्ये, भेंडी, गवार व फ्लॉवरच्या पिकांचे नुकसान झाले आहे. परिणामी, बाजारात या फळभाज्यांची आवक घटली आहे. मागणीच्या तुलनेत आवक अपुरी पडल्याने भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी 100 वाहनांमधून शेतमालाची आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत आवक दहा वाहनांनी वाढल्याचे सांगण्यात आले.

परराज्यांतून आलेल्या शेतमालामध्ये कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे 10 ते 12 टेम्पो हिरवी मिरची, आंध्रप्रदेश व तामिळनाडू येथून 3 ते 4 टेम्पो शेवगा, कर्नाटक येथून 2 ते 3 टेम्पो घेवडा, 2 ते 3 टेम्पो पावटा, इंदौर येथून 7 ते 8 टेम्पो गाजर तर गुजरात, मध्य प्रदेशातून लसणाची 8 ते 10 ट्रक इतकी आवक झाली. स्थानिक भागातून सातारी आले सुमारे 800 ते 900 पोती, टोमॅटो 13 हजार ते 14 हजार क्रेटस, फ्लॉवर 8 ते 10 टेम्पो, कोबी 8 ते 10 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, भेंडी 5 ते 6 टेम्पो, भुईमूग 100 गोणी, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, कांदा 125 ट्रक यांसह आग्रा, इंदूर आणि आग्रा व स्थानिक भागांतून बटाटा 30 ते 32 ट्रक इतकी आवक झाली.

 

Back to top button