सिंहगड घाट रस्त्यावरील दरड काढली | पुढारी

सिंहगड घाट रस्त्यावरील दरड काढली

खडकवासला, पुढारी वृत्तसेवा: मुसळधार पावसात चार दिवसांपूर्वी सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावर कोसळलेल्या दरडी अखेर आज रविवारी (17) सायंकाळी वनविभागाने जेसीबी मशिनच्या साह्याने काढून रस्ता मोकळा केला. गुरुवारपासून रविवारपर्यंत अतिवृष्टीमुळे सुरक्षेसाठी हा रस्ता प्रशासनाने बंद केला होता. उद्या सोमवार (18)पासून गड पर्यटकांसाठी सुरू होणार आहे.

पावसाचा जोर कमी झाला असला तरी सिंहगड किल्ल्याच्या परिसरात अधूनमधून सरी कोसळत आहेत, त्या पार्श्वभूमीवर दरडी काढून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे, असे पुणे वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांनी सांगितले. गुरुवारी (14) घाट रस्त्यावर जगताप माचीजवळ मोठी दरड कोसळली होती. चार दिवसांपासून पडलेल्या दरडीचा मलबा, दगड रस्त्यावर तसेच पडले होते.

त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता, याकडे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर अखेर दरड हटविण्यात आली. सिंहगड वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी बाळासाहेब लटके म्हणाले, प्रशासनाच्या आदेशानुसार उद्यापासून गड पर्यटनास खुला होणार आहे . पावसामुळे घाट रस्त्यावर दरड कोसळण्याचे प्रकार घडत आहेत, त्यामुळे तेथे सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.

Back to top button