धायरी : पुढारी वृत्तसेवा: सिंहगड रस्ता परिसरातील नर्हे येथील अभिनव कॉलेज रस्त्यावर एकशांती सोसायटी ते जोगदंड टाकीपर्यंतचा रस्ता चिखलमय झाला आहे. यामुळे या परिसरातून जाताना दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून, चारचाकी गाड्याही या चिखलयुक्त खड्ड्यात अडकून बसत आहेत. हा रस्ता तीव्र उताराचा आहे. साहजिकच, रस्ता उतरताना पादचारी अनेकदा घसरून पडत आहेत.
हा परिसर मोठ्या लोकसंख्येचा आहे. अनेक मोठमोठे गृहप्रकल्प, शैक्षणिक संस्था असल्यामुळे या परिसरात येणार्या-जाणार्या नागरिकांची व वाहनांची संख्या मोठी आहे. या खड्डेयुक्त चिखलमय रस्त्याचा विद्यार्थी, कामगार, महिला, नागरिक, वाहनचालक व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्यावर चालताना चिखलात पाय रुतून बसतात. या चिखलातून जाताना अनेक ज्येष्ठांना बाहेर काढताना मोठा त्रास होत आहे. महिलांना, मुलांना येथून चालत जाणेदेखील मुश्कील झाले आहे. याबाबत संबंधित विभागाला कळवूनसुद्धा कोणतीही दखल घेण्यात आली नाही.
– प्रवीण वाल्हेकर, ग्रामपंचायत सदस्य