जमावबंदीच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता, लोणावळ्यात पर्यटकांची तुफान गर्दी | पुढारी

जमावबंदीच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता, लोणावळ्यात पर्यटकांची तुफान गर्दी

लोणावळा : जिल्हाधिकारी यांनी पर्यटनस्थळांवर लागू केलेल्या जमावबंदी कलम 144 ला लोणावळा शहरात पर्यटकांनी अक्षरशः वाटाण्याच्या अक्षता लावल्या. मात्र, पोलिसांनी भुशी धरण, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंटकडे जाणार्‍या मार्गावर नाकाबंदी लावत पर्यटकांना रोखल्याने त्याठिकाणी तसेच शहरातील इतर काही भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाल्याचे बघायला मिळाले.

हवामान खात्याने याबाबत दिलेल्या रेड अलर्ट इशार्‍याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव जिल्ह्याच्या विविध भागांतील पर्यटनस्थळे तसेच गडकिल्ले, धरण, लेण्या आदी ठिकाणी 14 ते 17 जुलै मध्यरात्री 12 वाजेपर्यंत जमावबंदी कलम 144 लागू करण्यात आले होते. याबाबत प्रसिद्धी माध्यमे तसेच सोशल मीडियावर बातम्या प्रसारित केल्या जाऊनही त्याकडे दुर्लक्ष करून लोणावळा शहरात मोठ्या संख्येने पर्यटक झाले होते.

त्यामुळे एकीकडे धरण, धबधबे, किल्ले याकडे जाण्यापासून या पर्यटकांना रोखणे आणि दुसरीकडे रस्त्यावर झालेली प्रचंड वाहतूककोंडी सोडविणे असे दुहेरी काम करताना पोलिसदल अक्षरशः मेटाकुटीला आल्याचे निदर्शनास येते होते. भुशी धरणाकडे जाणार्‍या मार्गावर नौसेना बाग याठिकाणी लावण्यात आलेल्या नाकाबंदीवर सर्वांधिक ताण दिसत होता.

पावसाचा जोर थंडावला
लोणावळा शहरात शनिवारपासून पावसाचा जोर ओसरला असून, शनिवारी सकाळी 7 ते रविवारी सकाळी 7 वाजेपर्यंत 24 तासांत 132 मिलिमीटर (5.20 इंच) इतका पाऊस नोंदविण्यात आला. या वर्षी आत्तापर्यंत अर्थात 17 जुलै रोजी सकाळपर्यंत एकूण 2480 मिलिमीटर (97.94 इंच) इतका पाऊस नोंदविण्यात आला आहे. मागील वर्षी या तारखेपर्यंत 1416 मिलिमीटर (55.76 इंच) पाऊस झाला होता.

Back to top button