पिंपरी : दुभाजकामध्ये पाणी साचून डास उत्पत्ती? | पुढारी

पिंपरी : दुभाजकामध्ये पाणी साचून डास उत्पत्ती?

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात चिंचवडच्या सेंट मदर टेरेसा उड्डाणपूल ते दापोडीच्या हॅरिस पुलापर्यंत पुणे मेट्रोच्या मार्गिकेचे काम पूर्ण होऊन दीड वर्षे झाले आहेत. तरी, मार्गिकेच्या खालील दुभाजकामध्ये माती भरून रोपे लावण्यात आलेले नाहीत. त्या रिकाम्या भागात पावसाचे पाणी साचून डास उत्पत्तीचा धोका निर्माण झाला आहे.

शहरातील मदर टेरेसा उड्डाणपूल ते हॅरिस पुलापर्यंतचे 7.5 किलोमीटर अंतराचे मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर पिंपरी ते फुगेवाडी अशी 5.8 किलोमीटर अंतरावर मेट्रो साडेतीन महिन्यांपासून धावत आहे. असे असले तरी, संत तुकारामनगर व फुगेवाडी स्टेशन वगळता पिंपरी, नाशिक फाटा, कासारवाडी या तीन मेट्रो स्टेशनची कामे सुरूच आहेत.

त्या कामांसाठी वारंवार रस्ते वाहतुकीस बंद केले जात असल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. दुसरीकडे, कामासाठी तोडलेले दुभाजक महामेट्रोने दीड वर्षांपूर्वी पूवर्वत केले आहेत. मात्र, त्यात माती व खत टाकून रोपे लावलेली नाहीत. काही ठिकाणी झुडपी उगवली आहेत.

पालिकेकडून सुशोभीकरण तर मेट्रोकडून दुर्लक्ष
‘स्वच्छ व सुंदर पिंपरी-चिंचवड’साठी महापालिका रस्ते व परिसर चकाचक करून सुशोभीकरण करत आहे. रस्त्याच्या दुभाजकांवर रंगीबेरंगी आकर्षक पद्धतीच्या कुंड्या ठेवून शहराच्या सौंदर्यात भर घातली जात आहे. मात्र, चिंचवड ते दापोडी मार्गावरील दुभाजकामध्ये शोभिवंत रोपे लावण्याकडे महामेट्रो दुर्लक्ष करीत असल्याचे सौंदर्यास बाधा निर्माण होत आहे.

Back to top button