पिंपरी : नागरिकांसाठी लवकरच फाईव्ह-जी वाय-फाय सेवा | पुढारी

पिंपरी : नागरिकांसाठी लवकरच फाईव्ह-जी वाय-फाय सेवा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरातील नागरिकांना व्यवसाय करणे सुलभ व्हावे यासाठी तसेच, पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी केंद्राच्या दूरसंचार विभागामार्फत पीएम-वाणी योजनेतंर्गत शहरातील नागरिकांना फाईव्ह-जी वाय-फाय सेवा देण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील 270 ठिकाणी स्मार्ट वाय फाय बसविण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांनी दिली.

या संदर्भात झालेल्या बैठकीत संचार व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे उपमहासंचालक विक्रम मालविया, पुणे विभागाचे टेलिकॉम अधिकारी जयकुमार थोरात, स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य वित्तीय अधिकारी सुनील भोसले, कंपनी सेक्रेटरी चित्रा पवार व सल्लागार प्रतिनिधी उपस्थित होते.

शहरासाठी सुसज्ज वायफाय व्यवस्था उभी करून पालिका भवन, सर्व क्षेत्रिय कार्यालये, पालिका रूग्णालय, उद्यान तसेच, निगडीतील कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर आदी ठिकाणी संपूर्ण शहर जोडण्यासाठी स्मार्ट सिटीअंतर्गत एकूण 270 ठिकाणी सिटी वाय- फाय बसविण्यात आले आहेत.

या प्रकल्पातंर्गत वाय-फाय ऍक्सेस नेटवर्क इंटरफेसच्या फ्रेमवर्क अंतर्गत केंद्र सरकारद्वारे मंजुर असलेला प्रकल्प जोडला जाणार आहे. यामध्ये पब्लिक डेटा ऑफिस (पीडीओ), पब्लिक डेटा ऑफिस एग्रीगेटर (पीडीओए) व सेंट्रल रजिस्ट्री सारख्या घटकांचा समावेश आहे.
या सुविधेच्या नोंदणीसाठी कोणतेही शुल्क नाही. त्यासाठी संबंधित अ‍ॅप डाउनलोड करावे लागणार आहे. मोबाईलधारकास त्याच्या आवडीचे सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क निवडता येणार आहे. त्यासाठी आवश्यक रक्कम भरावी लागणार आहे.

Back to top button