

पुणे : बिहारमधील पाटणा येथे एका घरात गॅस गळतीने स्फोट झाला. यात चार जण जखमी झाले. डॉक्टरांनी त्यांना पुणे किंवा मुंबई येथे हलविण्यास सांगितले. याच वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत त्यांना स्वखर्चाने पुण्यासाठी इमर्जन्सी एअरलिफ्ट करण्याचा
आदेश दिला. महाराष्ट्रातील मौजे गुरसाळे (ता. खटाव, जि. सातारा) येथील अमोल जाधव यांचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी बिहारमधील पाटणा येथे वास्तव्यास आहे. शनिवारी मध्यरात्री 2 वाजता राहत्या घरात गॅसच्या गळतीने मोठा स्फोट होऊन, कुटुंबातील चारही लोक मोठ्या प्रमाणात भाजले. त्यांना तत्काळ पाटणा येथे खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
मात्र, डॉक्टरांनी त्यांना पुण्यात हलविण्यास सांगितले. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून आले अन् या मराठामोळ्या कुटुंबाच्या दुःखाचे ओझे हलके झाले. जखमींसाठी हवाई वाहतुकीचा होणारा लाखोंचा खर्च कोठून करणार, हा गंभीर प्रश्न होता. अनेकांकडे मदत मागितली. मात्र, यश आले नाही. या वेळी एका नातेवाइकाने सांगलीचे आमदार अनिल बाबर यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क केला. संपर्क झाल्यावर नातेवाइकांनी सर्व हकिगत मुख्यमंत्र्यांना सांगितली. त्यानंतर लगेचच सूत्रे फिरली.
खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी प्रथम आणि नंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना अतितत्काळ शासकीय मदत मिळण्यासाठी विनंती केली. परंतु, काही तांत्रिक अडचणीमुळे शासकीय मदत उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे वेळ अतिशय नाजूक असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी विनाविलंब स्वखर्चातून त्या कुटुंबाला दिवस उजाडण्याच्या आत पुण्यात आणण्याचा आदेश शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना दिला आणि विमान रविवारी सकाळीच पुण्यात दाखल झाले. त्यानंतर या रूग्णांना पुण्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पुणे विमानतळावर दररोज दोन-तीन मेडिकल इमर्जन्सीसाठी विमानांची ये-जा असते. आजही दोन विमाने आली. त्यांना आम्ही प्राधान्याने लँडिंगची परवानगी दिली. या विमानांमधून उतरलेल्या रूग्णांना पुणे आणि परिसरातील रूग्णालयात दाखल करण्यात येते.
– संतोष ढोके, संचालक, विमानतळ, पुणे