बारामती : पुढारी वृत्तसेवा: बारामती शहर व तालुक्यात सर्वप्रथम मॉलसंस्कृती सुरू करून दर्जा व गुणवत्तेच्या जोरावर ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देणार्या गांधी परिवाराचे यश कौतुकास्पद असल्याचे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले. येथील इंदापूर रस्त्यावरील मोतीबाग येथे अजिंक्य बझार मॉलचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.
या वेळी बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, माजी नगराध्यक्ष जवाहर शाह-वाघोलीकर, पौर्णिमा तावरे, योगेश जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकिलकर, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांच्यासह शहरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पवार म्हणाले, "गांधी परिवाराने शहराच्या विकासात भरीव योगदान दिले आहे. व्यवसाय करत असताना सामाजिक बांधिलकी जपली आहे. बारामतीचा चौफेर विकास होत असताना ग्राहकांच्या गरजा लक्षात घेत शहरात मॉल सुरू केले. मोतीबागेत इंदापूर रस्त्यावर दहा हजार स्क्वेअर फूट प्रशस्त दालनात नव्याने मॉल सुरू करत ग्राहकांसाठी मोठा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
या दालनात किराणा, प्लास्टिक, कॉस्मेटिक, स्टील, खेळणी, कॉक्ररी, ड्रायफ्रूट्स आदी रास्त भावात ग्राहकांना मिळणार असून नेहमीप्रमाणे सण, उत्सव वेळी विविध डिसकाउंट्स ऑफर असणार असल्याचे अजिंक्य बझार मॉलच्या संचालिका धनश्री गांधी यांनी सांगितले. मॉल सुरू झाल्यावर खरेदी करणारे पहिले तीन भाग्यवान ग्राहक व जागेचे मालक बोरावके बंधू यांचा सत्कार अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. उपस्थितांचे स्वागत राजकुमार गांधी, इंद्रजित गांधी, अतुल गांधी, वैभव गांधी, अजिंक्य गांधी आदींनी केले. सूत्रसंचालन अनिल सावळे पाटील यांनी केले.