स्वारगेट-सासवड-निरा शटलसेवा पूर्ववत करणार; सासवड आगार व्यवस्थापकांची माहिती | पुढारी

स्वारगेट-सासवड-निरा शटलसेवा पूर्ववत करणार; सासवड आगार व्यवस्थापकांची माहिती

वाल्हे, पुढारी वृत्तसेवा: सासवड-निरा-स्वारगेट शटल सेवा महिनाभरात पूर्ववत सुरू करणार असल्याचे सासवड आगार व्यवस्थापकांनी सांगितल्याचे भाजप प्रदेश ओबीसी उपाध्यक्ष सचिन लंबाते यांनी सांगितले. हडपसर – निरा या मार्गावर पीएमपीएल बससेवा 21 जानेवारी रोजी गाजावाजा करीत सुरू झाली होती. सर्वच पक्षातील कार्यकत्र्यांची श्रेयासाठी चढाओढ सुरू होती. घोषणा बाजीत वाल्हे, निरा येथे बसचे जोरदार स्वागत झाले होते. मात्र नंतर एसटी महामंडळ व पीएमपीएमएलमधील स्पर्धात्मक वादामुळे ही सेवा बंद होण्याची शक्यता होती. दरम्यान, सासवड एसटी आगाराने नव्याने नीरा ते स्वारगेट या मार्गावर शटल बसच्या फेर्‍या वाढविल्या होत्या.

जूनच्या सुरुवातीलाच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पुणे महानगरपालिकेची ’पीएमपील’ बस सेवा बंद होण्याच्या हालचालींना वेग आला होता. मात्र, या वेळी वाल्हे, नीरा, सासवड मार्गावरील गाव खेड्यातील प्रवाशांनी पीएमपीएल बसच पाहिजे, अशी भूमिका घेतली होती. काहींनी पीएमपीएल बससेवेप्रमाणे एसटीनेही गावखेड्यात व वाडीवस्तीवर थांबा देऊन दर तासाला किंवा अर्ध्या तासाला बस सेवा सुरू केल्यास स्वागत करण्याची भूमिका मांडली होती.

सासवड आगार व्यवस्थापक मनीषा इनामके व स्थानक प्रमुख इसाक सय्यद यांनी 8 जूनपासून ही शटल बस सेवा सुरूही केली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून ती बंद असून ग्रामीण भागातील विद्यार्थी, कामगार, प्रवासी व नागरिकांची ऐन पावसाळ्यात गैरसोय होऊ लागली होती. यामुळे, स्वारगेट- सासवड – निरा शटल बससेवा पूर्ववत सुरू करण्याबाबत विभागीय नियंत्रकांना पत्रव्यवहार केल्याचे लंबाते यांनी सांगितले. त्यांनीही प्रतिसाद देत महिनाभरात सेवा पूर्ववत करणार असल्याचे सांगितले, असेही लंबाते यांनी सांगितले.

पावसाचा जोर वाढल्याने त्याचा फटका एसटीच्या उत्पन्नास बसत आहे. तसेच स्वारगेट- सासवड- निरा शटल बससेवेला अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. परिणामी शटल बस काही दिवसांसाठी स्थगित ठेवल्या होत्या. मात्र, आता पावसाचा जोर कमी झाल्याने व प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादावरून शनिवार (दि.16) पासून टप्प्याटप्प्याने ही शटल बससेवा सुरू करत असून, ती पूर्वरत सुरू होईल.

                                                 – मनीषा इनामके, आगार व्यवस्थापक सासवड.

 

Back to top button