भीमाशंकरला जोडणार्‍या मार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा | पुढारी

भीमाशंकरला जोडणार्‍या मार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा

राजगुरूनगर : पुढारी वृत्तसेवा: केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग ज्योतिर्लिंग जोडणी कार्यक्रमांतर्गत शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड-चास-वाडा-तळेघर-श्री क्षेत्र भीमाशंकर यासह बनकर फाटा- जुन्नर- घोडेगाव- तळेघर- श्री क्षेत्र भीमाशंकर या रस्त्यांना नवीन राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ही माहिती दिली. केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच यास मंजुरी दिली असून याद्वारे खेड, आंबेगाव व जुन्नर अशा तीनही तालुक्यांच्या पर्यटनात व विकासात भरीव वाढ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपण खासदार असताना म्हणजे, सन 2015 पासून आंबेगाव, जुन्नर व खेड हे तीनही तालुके केंद्र शासनाच्या भारतमाला परियोजनेअंतर्गत एकत्रितपणे श्री क्षेत्र भीमाशंकर या पवित्र ज्योतिर्लिंग देवस्थानला जोडावेत, यासाठी सातत्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे प्रयत्नशील होतो. व्यक्तिशः केंद्रीय दळणवळण व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची अनेकदा भेट घेतली होती. त्यांनीही प्रस्ताव सकारात्मक पद्धतीने स्वीकारत सर्व तांत्रिक व आवश्यक बाबी पूर्ण करून लवकरात लवकर या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळवून देऊ अशी ग्वाही दिली होती, असे आढळराव पाटील म्हणाले.

आपण खासदार असताना केलेल्या कामांमधील हे प्रमुख काम होते. आता या महामार्गाला मंजुरी मिळाल्याने यावर सक्षम वाहतूक व्यवस्था निर्माण करणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास शक्य होणार आहे. मंजुरीबद्दल केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच नवीन महामार्गाच्या निर्मितीचे काम लवकरात लवकर हाती घ्यावे यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही आढळराव पाटील यांनी सांगितले.

तीन तालुक्यांच्या पर्यटनात लक्षवेधी वाढ होणार
महामार्गामुळे आंबेगाव, जुन्नर व खेड या तीनही तालुक्यांच्या पर्यटनात लक्षवेधी वाढ होणार आहे. विशेषतः आदिवासी भागातील नागरिकांच्या जीवनमानात महत्त्वपूर्ण बदल घडून येणार आहेत. या भागात नैसर्गिक साधनसंपत्ती व जैवविविधता तसेच पर्यटकांना आकर्षित करणारी ठिकाणे मोठ्या प्रमाणात आहेत. श्री क्षेत्र भीमाशंकरला येणार्‍या भाविकांची संख्याही फार मोठी असून पर्यटकांसाठी या महामार्गाचा भविष्यात खूप मोठा उपयोग होणार आहे.

 

Back to top button